जिल्हा

कळवा-खारीगावमधील पाच विकासकांवर गुन्हे दाखल

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदा बांधकामांची उभारणी ठाणे: कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे शहरातील कळवा आणि खारीगावमधील पाच विकासकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठामपाकडून बांधकाम परवानगी मिळाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे बेकायदा इमारती उभारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अशाचप्रकारे आणखी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदा बांधकामांची उभारणी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत उभारणीप्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरु आहे. महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे बेकायदा इमारती उभारण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी भुमाफियांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तसेच ईडी मार्फतही चौकशी सुरु आहे. असे असतानाच आता ठाणे महापालिका क्षेत्रातही अशाचप्रकारे बेकायदा इमारती उभारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. या इमारती अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी भुमाफियांनी महापालिकेची बनावट प्रमाणपत्रे तयार केली असून त्यात बांधकाम परवानगी आणि वापर परवाना प्रमाणपत्रांचा समावेश आहे. या प्रमाणपत्रांचा सदनिकांच्या विक्री दस्तामध्ये समावेश करत भुमाफियांनी त्यांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून या संदर्भात त्यांनी नोव्हेंबर महिन्यात पालिकेकडे याबाबत तक्रार करत त्यासोबत सदनिका विक्री दस्तचे पुरावे दिले होते. याआधारे महापालिका शहर विकास विभागातील कार्यकारी अभियंता रविशंकर शिंदे यांनी तपासणी केली असता, सदनिका विक्री दस्तमध्ये असलेले बांधकाम परवानगी आणि वापर परवाना प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी गौरंश पवार, दिपक झोळंबेकर, किशोर पाटील, अक्षद पाटील या चारजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची नुकतीच जामीनावर सुटका झाली आहे. कळवा, खारेगाव येथील सर्व्हे नंबर ५९ हिस्सा नंबर ०४, सर्व्हे नंबर ६० हिस्सा नंबर ३ व २, सर्व्हे नंबर ४९, हिस्सा नंबर ६, सर्व्हे नंबर ११७ याठिकाणी बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती अधिकृत असल्याचे भासवून त्यांना पालिकेकडून बांधकाम परवानगी आणि वापर परवाना मिळाल्याची प्रमाणपत्र तयार करण्यात आलेली आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. माजिवडे मानपाडा प्रभागात अनधिकृत बांधकामे जोरात माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत संधी मिळेल तेथे गाळे आणि इमारती बेकायदेशीरपणे उभ्या राहत आहेत. पत्रे उभारून त्या आड गाळे बांधले जात आहेत, आश्चर्य म्हणजे पुलाखाली देखील बांधकामे करण्यात आली आहेत. पाडा क्र. १ सह उर्वरित बाळकुम भागात बेकायदेशीर इमारती उभ्या राहिल्या आहेत. यावर तक्रारी झाल्यानंतर वरवर कारवाई करण्यात येत असल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600