महाराष्ट्र
दादोजी कोंडदेव स्टेडिअमने कमावले सव्वा दोन कोटी
ठाणे: दुरुस्ती आणि देखाभालीवर लाखो रुपये खर्च होणाऱ्या दादोजी कोंडदेव स्टेडियमला पांढरा हत्ती अशी ओळख मिळू लागली असताना विविध स्पर्धांतून गेल्या काही दिवसात या स्टेडियमने महापालिकेच्या क्रीडा विभागाला दोन कोटी २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.
गेली अनेक वर्षे ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होत आहेत. त्या तुलनेत या स्टेडियमचे उत्पन्न नगण्य असते. त्यामुळे हा पांढरा हत्ती कुठवर पोसायचा असा प्रश्नही दक्ष नागरिक उपस्थित करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत या स्टेडियमचे रुपडे आता पालटले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी आणि सोयीसुविधा येथे उपलब्ध झाल्याने क्रिकेट आयोजक, खेळाडू आणि प्रेक्षकांची पाऊले या स्टेडिअमकडे वळू लागली आहेत. त्यामुळे कधी नव्हे तर या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाला दुप्पटीहून अधिक म्हणजे दोन कोटी २३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
१९८२ साली बांधण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडीअमची अनेक वर्षांपासून दूरावस्था सुरू होती. मुंबईच्या क्रिकेटमध्ये ठाण्याच्या स्टेडिअमचा उल्लेख असूनही येथे कुणी फिरकत नव्हते. २००० साली येथे रणजी करंडक स्पर्धा झाल्या. त्यावेळी अनेकांनी येथील सोयी सुविधांवर बोट ठेवले होते. त्यानंतर बीसीसीआयने केलेल्या अटीशर्तींमुळे येथे एकही सामना होऊ शकला नाही. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी आवश्यक असलेले बदल करून आंतरराष्ट्रीय खेळपट्टी येथे करून घेतली.
दिवस रात्र सामन्यांसाठी फ्लड लाईटही बसवण्यात आले. तेव्हापासून या स्टेडिअमचा नूरच पालटला आहे. स्टेडिअम सुसज्ज होताच नजिब मुल्ला क्रिकेट चषकाने धडाक्यात येथे सामने सुरू झाले. पहिल्याच आठवड्यात त्यामुळे स्टेडिअमच्या माध्यमातून क्रीडा विभागाला ५६ लाख रुपये मिळाले. त्यानंतर आयपीएलच्या संघांना सरावासाठी स्टेडियम देण्यात आला. त्या मधूनही लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले. पण नुकतेच येथे झालेल्या आयएसपील सामन्यांमुळे पालिकेला एक कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. हे सामने इतके गाजले की कधी नव्हे ते सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टेडिअम हाऊसफूल झाले. या प्रतिसादामुळे क्रीडा विभागाचे उत्पन्न एकूण २ कोटी २३ लाख इतके झाले.
ठाणे पालिकेच्या क्रीडा विभागाला दरवर्षी ७० ते ८० लाखांच्या उत्पन्नाचे टार्गेट दिले जाते. मात्र दादोजी कोंडदेव स्टेडीअममध्ये बसवण्यात आलेल्या फ्लड लाईट आणि नुतनीकरणामुळे येथे क्रीकेट सामने भरवून उत्पन्न वाढण्याची शक्यता गृहती धरण्यात आली. त्यामुळे उत्पन्नाचे उद्धीष्टही दुपट्टीने वाढवून दिड कोटी करण्यात आले. पण क्रीडा विभागाने २१५ टक्के उत्पन्न या स्टेडिअममुळे मिळवून दिले. भविष्यातही असे सामने येथे दणक्यात भरवण्यात येणार आहेत. शक्य झाल्यास आयपील सामनेही सुरू होतील असा विश्वास क्रीडा विभागाच्या अधिकारी मिनल पालंडे यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600