जिल्हा
भातसा नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या परीक्षणाची मागणी
भातसा नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या परीक्षणाची मागणी
फोटो: ठाणे वैभव
शहापूर: शहापूर-किन्हवली-मुरबाड मार्गावरील सापगावजवळील भातसा नदीवरील पुलाचा खालील भाग कोसळत असल्याने सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याबाबत ठाणेवैभवने 'भातसा नदीवरील पूल ढासळू लागला' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत भिवंडी लोकसभा मतदार संघांचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळ यांना पत्र देत पुलाचे बांधकाम परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करण्याची मागणी केली आहे.
शहापूर या तालुक्याला जोडणारा सापगाव गावाजवळील भातसा नदीवरील पुलाचे आयुष्यमान संपुष्टात आले असून हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या शहापूर-मुरबाड महामार्गावरील सापगावजवळील भातसा नदीवरील पुल जीर्ण झाला आहे. या रस्त्यावरून चारचाकी, दुचाकी वाहने, एसटी महामंडळाच्या बस, जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असते. अशावेळी शालेय विद्यार्थी, चाकरमानी, व्यावसायिक याच रस्त्याने प्रवास करत असतात. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. शहापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सत्तर टक्के जनता या पुलावरून प्रवास करते. मात्र अशा परिस्थितीत या पुलावरून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तथापि या पुलाचे आयुष्यमान संपलेले असून पुल खालच्या तसेच वरच्या बाजुने जीर्ण झाला आहे. पावसाळ्यात बऱ्याच वेळा पुल पाण्याखाली येतो. याच पुलाचे पुढे बाजुस असलेल्या कांबारे पॉवर हाऊसजवळील आवरी-घोरपडी नदीवरील छोट्या पुलाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्याकरिता भविष्यात सावित्री पुलावरील दुर्घटनेप्रमाणे भातसा नदीपुलावर दुर्घटना होऊ नये म्हणुन सावधगिरी बाळगण्याकरीता संबंधित विषय गांभीर्याने हाताळुन या पुलाचे बांधकाम परीक्षण (स्ट्रक्चरल) ऑडीट होणेकरिता संबंधित विभागाकडून आदेशित करावे, अशी मागणी खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600