जिल्हा
कल्याणमधील इमारत दुर्घटनेतील रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी
कल्याणमधील इमारत दुर्घटनेतील रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : पूर्वेतील चिकणी पाडा येथील सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरणातील रहिवाशांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर धडक देत पुनर्वसनाची मागणी केली आहे.
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. प्रशासनाने मदत कार्य करीत रहिवाशांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था नूतन ज्ञानमंदिर शाळेमध्ये केली आहे. मात्र आता लवकरच शाळा सुरु होतील, त्यानंतर आम्ही कुठे जायचे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
डोळ्यांदेखत पै पै करून उभारलेला रहिवाशांचा संसार उघड्यावर पडला आहे. दोन दिवसानंतर प्रशासनाने पाच- दहा मिनिटात आपले महत्वाचे साहित्य काढण्याची मुभा दिली. यात शोधणार काय? सापडणार काय अशी अवस्था झाल्याचे रहिवासी रेखा पाठारे यांनी सांगितले. इमारत दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबामध्ये तिसरा दिवस विधी असताना, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना इमारतीमधील रहिवाशांना आपला संसार सावरायचा कसा असा प्रश्न पडला आहे.
शाळेमधील तात्पुरती सोय ही शाळा सुरू होण्याआधी कधीही बंद होऊ शकते. तातडीने आम्ही जायचं कुठे आणि घराचा बंदोबस्त करायचा कसा, त्यामुळे आमचे लवकरात लवकर पुनर्वसन करा अशी मागणी करीत पालिका मुख्यालयासमोर नागरिकांनी घोषणा दिल्या. तसेच जाहीर केलेली शासन मदत तातडीने मिळावी, उपचार झालेल्या, उपचार सुरू असलेल्या रुग्णांना तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुनर्वसन करावे अशी मागणी कडोंमपा मुख्यालय प्रवेशद्वारासमोर जमलेल्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्यावतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणी आयुक्तांच्या भेटीसाठी आपल्या मागण्या घेऊन गेलेल्या शिष्टमंडळाला अतिरिक्त आयुक्तांनी उद्या शुक्रवारी सकाळी 11 वा.वेळ दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600