जिल्हा
मेट्रो स्थानकाला श्री क्षेत्र प्राचीन शिवमंदिर नाव देण्याची मागणी
मेट्रो स्थानकाला श्री क्षेत्र प्राचीन शिवमंदिर नाव देण्याची मागणी
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: अंबरनाथमधील प्रस्तावित मेट्रोच्या मार्गिकेत कानसई आणि महात्मा गांधी विद्यालयासमोर मेट्रो स्थानकाची उभारणी करावी तसेच महात्मा शाळेजवळील स्थानकाला श्री क्षेत्र प्राचीन शिवमंदिर मेट्रो स्टेशन असे नाव येण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे माजी नियोजन समिती सभापती कुणाल भोईर यांनी केली आहे.
खा, डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी आणि अधिकाऱ्यांसमवेत प्रस्तावित मेट्रोच्या कामांसंदर्भात झालेल्या बैठकीत अंबरनाथच्या दोन्ही मेट्रो स्थानकांबाबत चर्चा झाली. यावेळी दोन्ही मार्गिकांच्या स्थानकाबाबतचे निवेदन खासदार डॉ. शिंदे यांना देण्यात आले. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे अंबरनाथमध्ये मेट्रो दाखल होणार आहे.
मेट्रोची प्रस्तावित मार्गिका पाच ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर, अंबरनाथमार्गे चिखलोलीला जाणार आहे. तर मार्गिका १४ तळोजा , काटई, नेवाळी, आनंदनगर एमआयडीसी, टी सर्कलमार्गे बदलापूरकडे जाते.
कल्याण-बदलापूर महामार्गाजवळ अंबरनाथच्या जीएनपी प्लाझाजवळ मेट्रोचे स्थानक प्रस्तावित आहे. कल्याण-भिवंडी-ठाणे मार्गिका पाच आणि बदलापूर-नवी मुंबई-कांजूरमार्ग मार्गिका १४ यांचे एकत्रीकरण करण्यात यावे, यामुळे ठाण्याकडे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रवासाची चांगली सोय होणार आहे, यामुळे दोन्ही दिशांकडे जाणारा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. प्रस्तावित मेट्रोच्या मार्गावर वडोळ आणि कानसई विभागादरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे उड्डाणपुलाजवळ मेट्रो स्थानक निर्माण करून त्याला कानसई गाव मेट्रो स्थानक असे नाव द्यावे, महात्मा गांधी शाळेजवळ मेट्रो स्थानक निर्माण करून त्याला क्षेत्र प्राचीन शिवमंदिर मेट्रो स्थानक असे नाव द्यावे, यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल शिवाय भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हिताचे ठरू शकेल, प्रस्तावित दोन्ही मेट्रो स्थानकासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी देखील श्री.भोईर यांनी केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600