जिल्हा
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर माघारी
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर माघारी
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे ग्रामीण पट्ट्यात निर्माण झालेल्या अचानक वादळी वातावरणाचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला बसल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. मात्र, पायलटने वेळीच परिस्थितीचा अंदाज घेत हेलिकॉप्टर मागे वळवत जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर सुरक्षित उतरवले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी मुंबईहून मुरबाडकडे रवाना झाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र, हेलिकॉप्टर ऐरोली परिसरात पोहोचताच समोरून येणारे वादळी वातावरण आणि खराब हवामान पायलटच्या निदर्शनास आले.
संभाव्य धोका लक्षात घेत पायलटने तातडीने उपमुख्यमंत्री शिंदे यांना परिस्थितीची माहिती दिली. पुढे प्रवास करणे धोकादायक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त करत हेलिकॉप्टर मागे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टर जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर सुरक्षित उतरविण्यात आले.
या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक पात्रुडकर, सुरक्षा रक्षक तसेच विमान कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600