जिल्हा

बाबरी ढाचा कधीच मशीद नव्हती, तो एक कलंक होता! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाण्यात वक्तव्य

ठाणे: बाबरी ढाचा कधीच मशीद नव्हती, तो एक कलंक होता असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान केले आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने ठाण्यातील गावदेवी मैदानात तीन दिवसीय भव्यदिव्य 'रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी 'रामराज्य संकल्पना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी' या विषयावर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले, 22 जानेवारीला प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे हे आपले भाग्य आहे. 22 जानेवारीचा दिवस सर्व कारसेवकांसाठी आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे या रामायण महोत्सवाचे उद्घाटन मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर कारसेवक म्हणून करत असल्याचे त्यांनी सांगितले. मोदीजी नवभारताची निर्मिती करत आहेत. गुलामगिरीची अंतिम निशाणी आपण संपवत आहोत आणि राम लल्लाच्या मंदिराची निर्मिती आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी यावेळी आपल्या भाषणांमधून विरोधकांचा देखील चांगलंच समाचार घेतला. काही लोक या कार्यक्रमाला जात नाहीत, काही लोक प्रश्न विचारतात मोदींनी काय केलं? मी त्यांना प्रश्न विचारतो, 2007 साली यांनीच न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, की रामाचा जन्म तिथेच झाला याचा पुरावा नाही, यांनी राम जन्मभूमीवरील आपला हक्क सोडण्याची तयारी देखील केली होती. 2012 साली दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात रामसेतू याला पुरावा नाही, तो तोडून तिथून जहाज येण्यासाठी मार्ग बनवावा,अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात असल्याचे फडणवीस म्हणाले. राम राज्याची संकल्पना आपण पहिल्यांदा मांडत नाही. राम मंदिर काल्पनिक आहे हे सांगणारे हे लोक आहेत. पण नरेंद्र मोदी यांनी सांगितले तिथेच रामाचा जन्म झाला, तिथेच 64 खांब उभे राहिले, तिथेच मूर्ती सापडल्या, त्यामुळे मंदिर तिथेच उभे राहणार. एक भारत, श्रेष्ठ भारत ही मोदींची संकल्पना आहे. सुशासन पारदर्शिता समान संधी आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य असल्याचे फडणवीस म्हणाले. हे राम कार्य आहे त्यामुळे यात भ्रष्टाचार चालणार नाही, मोदींनी सांगितले आहे, एक रुपया मिळाला तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत एक रुपयाच पोहोचेल. गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम मोदींनी घेतला असून 25 कोटींच्या वर लोक गरिबी रेषेच्या वर आले असल्याचे फडणवीस म्हणाले. रामराज्याची संकल्पना म्हणजे दहशतवादमुक्त राज्य. ज्यांच्या मनामध्ये राम आहे त्यांच्याच हातून अशी कामे घडतात. देव, देश धर्मासाठी आपण लढतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मोदीजी लढत आहेत. राजकीय परिवारातील लोक जर राजकारणात आले तर त्यास कोणतीही हरकत नाही, फक्त त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवावे असे आव्हानदेखील फडणवीस यांनी केले. पुढच्या काळात भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे, असे मोदीजींनी सांगितले आहे. ज्या प्रकारे रामाने हनुमानाला त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली तशीच मोदीजींनी देखील भारताला त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली आहे. आपल्या देशात आपल्याला रामराज्य निर्माण करायचे आहे, 22 जानेवारीपासून त्याची वाटचाल होत असून रामराज्यात प्रत्येक व्यक्तीला, जाती पातीच्या लोकांना त्यात एक स्थान असेल असा आशावाद फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कोविडनंतर जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण आपल्या भारताची अर्थव्यवस्था कोलमडली नाही. आता पाचव्या क्रमांकावर आपण आलो आहोत. आता जगातल्या सर्वात जास्त डिजिटल व्यवहारात भारताने चीनला देखील मागे टाकले आहे. इनोव्हेशनमध्ये आज आपली परिस्थिती अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इनोवेशन सुरू केलेले आहे की भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी चंद्रयान उतरवले जे अमेरिकेलाही जमले नाही, जे जपानलाही जमलं नाही, ते भारताने करून दाखवले आणि आता सूर्याचे देखील मॅपिंग आपण करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600