जिल्हा
सोडतग्रस्त नगरसेवक नवीन प्रभागाच्या शोधात
कल्याण: कडोंमपा निवडणुकीच्या १२२ जागांसाठी प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. या सोडतीत कडोंमपातील अनेक माजी नगरसेवक, नगरसेविकांना आरक्षणाचा फटका बसला असून त्यांना आता अन्य प्रभागातून निवडणूक लढण्याची नामुष्की ओढवणार आहे.
कडोंमपासाठी यंदा प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेतली जाणार आहे. पालिकेच्या १२२ प्रभागांसाठी चार सदस्यांचे २९ प्रभाग व तीन सदस्यांचे दोन प्रभाग असे ३१ प्रभाग जाहीर करण्यात आले होते. या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी एस.सी, एस.टी, ओबीसी, सर्वसाधारण वर्गासह त्यातील महिला वर्गासाठी आरक्षित असलेल्या जागांकरिता प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत कल्याण-डोंबिवलीतील अनेक माजी नगरसेवक, नगरसेविकांना धक्का बसला आहे.
डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्र.२६ मधील चार जागांसाठी जाहीर झालेल्या सोडतीत दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या प्रभागातील मागच्या निवडणुकीत निवडून आलेले भाजपचे संदीप पुराणिक, मुकूंद पेडणेकर, विश्वदीप पवार व मंदार हळबे या चारही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. या चार जागांसाठी पडलेल्या आरक्षणात दोन जागा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने या चौघांपैकी दोघांना आपल्याच घरातील महिला सदस्यांना निवडणूक रिंगणात उभे करावे लागणार आहे. तर उर्वरित दोन जागांपैकी एक जागा सर्वसामान्य वर्गासाठी आरक्षित असल्याने यातील एकाचे पुनर्वसन होईल, उरलेली एक जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने चार माजी नगरासेवकांपैकी तिघांना आरक्षणाचा फटका बसला आहे.
अशीच परिस्थिती कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये पडलेल्या आरक्षणामुळे निर्माण झाली आहे. मागच्या निवडणुकीत मनसेच्या कस्तुरी देसाई व तृप्ती भोईर तर शिवसेना शिंदे गटाच्या नीलिमा पाटील व वैजयंती गुजर-घोलप या चार महिला माजी नगरसेविका निवडून आल्या होत्या. या प्रभागातील चार जागांपैकी दोन जागा सर्वसाधारण महिला तर प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण व. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने चारपैकी दोघा माजी नगरसेविकांना सर्वसाधारण महिला वर्गातून संधी मिळेल तर एक माजी नगरसेविका सर्वसाधारण वर्गातून निवडणुकीला उभ्या राहू शकतात. तर एका माजी नगरसेविकेला या आरक्षणाचा फटका बसणार आहे.
कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ५ मधुन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक रवी पाटील यांनी त्यांच्या मुलासाठी तयारी सुरु केली होती. मात्र त्यांच्या या प्रभागातील चारही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांना आता दुसऱ्या प्रभागातून निवडणुकीला उभे राहण्यासाठी अंडर स्टँडिंग करावी लागणार आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक व माजी शहरप्रमुख वरुण पाटील हे मागच्या वेळी निवडून आलेल्या आधारवाडी प्रभागाची फोड करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या काही प्रभागांना जोडला असून मोठ्या प्रमाणात या प्रभागाचा भाग प्रभाग क्र. 1 मध्ये समाविष्ठ केल्याने याचा त्यांना या आरक्षणाचा फटका बसला आहे. कल्याणमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांचा जुना प्रभाग साई चौक हा इतर तीन प्रभागात विखुरल्याने त्यांना देखील नवीन प्रभाग पहावा लागणार आहे.
डोंबिवलीतील भाजपात पक्ष प्रवेश केलेले कॉंग्रेसचे माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर आणि नंदू म्हात्रे यांच्या जुन्या प्रभागाचा भाग विभागला गेल्याने आता यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग क्र. २५ मधुन निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र याठिकाणी आधीच भाजपाचे दोन सीटिंग माजी नगरसेवक निवडू आलेले असताना त्याचा पत्ता कट करून भाजपा पक्ष प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिली जाते की भाजपाच्या सिटिंग माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार त्यामुळे या प्रभागात नक्की कोणाला फटका बसणार हे सुद्धा पहावे लागणार आहे.
आंबिवली गावठाण प्रभागातून मागच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेला शिवसेना शिंदे पक्षाचे माजी नगरसेवक गोरख जाधव याचा प्रभाग नव्याने निर्माण केलेल्या प्रभाग क्र.३ मध्ये समाविष्ट केला असल्याने या प्रभागातील एक जागा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने गोरख जाधव यांना या आरक्षणाचा फटका बसला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600