जिल्हा
गाफील राहून नका; महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच निवडून द्या
गाफील राहून नका; महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच निवडून द्या
फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात प्रचार रॅलीत एकनाथ शिंदे यांचे आवाहन
ठाणे: “कोणीही तुमच्याकडे येऊन वेगळा पाठिंबा असल्याचं सांगितलं, तरी गाफील राहू नका. आपला पाठिंबा फक्त आणि फक्त महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच आहे,” असा स्पष्ट आणि ठाम संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना दिला.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार दौरा आणि रॅलीला संबोधित करताना त्यांनी विरोधकांच्या डावपेचांवर जोरदार प्रहार केला. या प्रचार दौऱ्याला आणि रॅलीला सर्व स्तरांतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
महायुतीच्या उमेदवारांसाठी एकजुटीचं आवाहन करताना शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात आहेत. मात्र मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच पाठिंबा देऊन भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
“या निवडणुकीत केवळ उमेदवार निवडायचे नाहीत, तर ठाण्याच्या विकासाची दिशा ठरवायची आहे. त्यामुळे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकायलाच हवा.”
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले की, “ठाण्याच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू दिला जाणार नाही.”
घोडबंदरसाठी आतापर्यंत ९५० कोटी रुपये देण्यात आले असून, भविष्यात गरज भासल्यास हा निधी आणखी वाढवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत, “काम सुरू आहे, थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
महिला मतदारांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “महिला माझ्या बहिणी आहेत. त्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं आहे. ‘लाडकी बहिण’सह कोणतीही लोककल्याणकारी योजना बंद होणार नाही.” योजनांबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
सभेच्या शेवटी १५ तारखेला होणाऱ्या मतदानाकडे लक्ष वेधत त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. गाफील राहू नका, दिशाभूल होऊ देऊ नका.”“कमिटमेंटचं दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदे,” असे ठाम शब्दांत सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600