जिल्हा
मुंब्र्याला बदनाम करू नका, तुम्ही जागा द्या; मी पुतळा उभारतो
डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना दिले प्रतिआव्हान
ठाणे: देवेंद्र फडणवीस यांनी जागा आणि सरकारी परवानगी द्यावी, मी मुंब्र्यात पुतळा उभारून दाखवतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुंब्रा-कळवा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे आव्हान दिले होते. त्यावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले.
डाॅ. आव्हाड म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना कदाचित कुणी सांगितले नसेल पण जिथून मुंब्र्याचा रस्ता सुरू होतो, तिथेच राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले यांचे मोठे चित्रशिल्प आणि महाराष्ट्राचा नकाशा आपण उभारला आहे. आता निवडणुकीत भाषणे ठोकून मुंब्र्याला बदनाम केले जात आहे, अशी टीका श्री.आव्हाड यांनी केली. मुसलमानांना कायम वाईट नजरेतून पहायचे, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत औरंगजेबाच्या दरबारात गेलेला मदारी मेहतर हादेखील मुसलमानच होता, असेही श्री.आव्हाड यांनी स्पष्ट केले.
मी कळवा-मुंब्र्याचे प्रतिनिधित्व करतो, जिथे ५० टक्के मुस्लिम तर ५० टक्के हिंदू आहेत. पण, कृपया मुंब्र्याला बदनाम करू नका ! मुंब्र्यात कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक रहात नाही. मतांसाठी हिंदू-मुस्लीम तुष्टीकरण करू नका, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राम मंदिराच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्यानेच आता छत गळत आहे. मी देखील 28 मंदिरे बांधली आहेत. पण, त्याचा गाजावाजा करीत नाही. मुंब्रा स्टेशनच्या बाजूला सुंदर मंदिर बांधले आहे. लोकांकडून वर्गणी गोळा करून तुळजाभवानीचे मंदिर बांधत आहे. देव हृदयात असावा लागतो. त्याचे प्रदर्शन करायचे नसते. मी हिंदू आहे. पण, मंदिरांच्या नावावर द्वेष पसरविणारा नाही, असेही श्री.आव्हाड यांनी स्पष्ट केले.
संविधान बाबत त्यांना छेडले असता जे राहुल गांधी यांनी संविधान दाखवले होते; त्याचा रंग लाल का आहे, याचा अर्थ त्यांनी यावेळी समजून सांगितला. लाल रंगाचा अर्थ प्रेम, हृदय. क्रांतीचा रंग लाल आहे, असे ते म्हणाले. आमचं रक्त सळसळत आहे. कारण तुम्ही संविधान बदलणार म्हणून! हृदयाचा रंग लाल आहे त्याचा काय नक्षलवाद्यांशी संबध आहे का, लहान पोरांसारखे खेळ करतात. राज ठाकरे म्हणाले होते की, मदरशांमध्ये मशिनगन मिळतील; पण, आजही माझे म्हणणे आहे की, मदरशांमध्ये वस्तराही मिळणार नाही. तुम्हाला हिंदूंना मुसलमानांच्या नावाने भडकवायचे आहे, असेही ते म्हणाले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600