जिल्हा
ठाण्याच्या रस्त्यांवर धावणार डबल डेकर
ठाण्याच्या रस्त्यांवर धावणार डबल डेकर
फोटो: ठाणे वैभव
पुढील आठवड्यात होणार चाचणी
ठाणे: पुढील आठवड्यात एक वातानुकूलित डबल डेकर बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. या बसची तांत्रिक टीमकडून अनौपचारिक तपासणी करण्यात येणार असून या बसची ठाण्याच्या रस्त्यावर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी झाल्यानंतर येत्या १५ ते २० दिवसांमध्ये दहा डबल डेकर बस ठाण्याच्या रस्त्यावर धावतील, अशी माहिती परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबईप्रमाणे ठाणेकरांना देखील डबल डेकर बसचा आनंद घेता यावा यासाठी दोन वर्षांपूर्वी १० डबल डेकर बसचा प्रस्ताव ठाणे परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला होता.
सध्या इलेक्ट्रीक बसमुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होत आहे. त्यानंतर परिवहन सेवेच्या माध्यमातून डबल डेकर बसचे स्वप्न देखील परिवहन प्रशासनाच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी डबल डेकर बसचा उल्लेख देखील अर्थसंकल्पात करण्यात आला होता. मात्र दोन वर्षात डबल डेकर बस परिवहनच्या ताफ्यात आणण्याच्या काहीच हालचाली परिवहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नव्हत्या.
सध्या परिवहनच्या ताफ्यात येण्यासाठी एक बस सज्ज झाली असून तिची तांत्रिक तपासणी पुढच्या आठवड्यात सोमवारी करण्यात येणार आहे. तसेच ठाण्याच्या रस्त्यावर देखील केवळ चाचणीसाठी ही बस धावणार आहे. या बसची यशस्वी चाचणी झाल्यानंतर येत्या १५ ते २० दिवसांत १० बसेस ठाण्याच्या रस्त्यावर धावतील अशी माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली आहे.
तीन हात नाका ते थेट घोडबंदर गायमुख हा पहिला मार्ग, दुसरा मार्ग शिळफाटा दत्त मंदिर ते डोंबिवलीचा एन्ट्री पॉइन्ट आणि तिसरा मार्ग पारसिक नगर मुंब्रा वळण रस्ता ते कळवा शिवाजी नगर हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या तीनही मार्गात डबल डेकर बसला कुठेही अडथळा नसल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे पहिल्या तीन बस या मार्गावर सोडण्याचे प्रयोजन आहे.
शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठांना यातून सवलतीच्या दरात प्रवास करण्याची संधी देण्याचे प्रयोजन आहे. त्यानुसार शनिवार आणि रविवारी एकाच तिकीटात तीन मार्गांवर त्यांना डबल डेकर बसमध्ये बसून फिरण्याची संधी देण्याचे प्रयोजन पूर्वी आखण्यात आले होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600