जिल्हा

सर्वसाधारण आरक्षणामुळे महापौरपदासाठी चुरस वाढली

भिवंडीत काँग्रेस, भाजपासह इतर पक्षांतील नगरसेवकांमध्ये चढाओढ भिवंडी: सर्वांचे लक्ष लागलेल्या भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाल्यामुळे काँग्रेस व भाजपसह इतर पक्षातील नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला असून पक्षांमधील नगरसेवकांमध्ये चुरस वाढली आहे. महापौर पदासाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून महापालिकेत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. असे असले तरी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक ३० नगरसेवक निवडून आले आहेत. त्या खालोखाल भाजपाला २२ नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले आहे. या दोन्ही पक्षाचे नगरसेवक महापौरपद मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी तयारी करू लागले आहे. नुकत्याच झालेल्या भिवंडी शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आता महापौर पद मिळवत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक धावपळ करीत आहेत. महापौर पद व सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक वेळी कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील हे अग्रेसर असतात. त्यामुळे यावेळी देखील कोणार्क विकास आघाडीची भूमिका महत्वाची ठरणार असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे काही नगरसेवक माजी महापौर विलास पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४७ नगरसेवकांचे बहुमत असताना कोणार्क विकास आघाडीला १८ नगरसेवकांनी पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे महापौर पदावर प्रतिभा पाटील या विराजमान झाल्या होत्या. आता महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी वाढणार चुरस वाढली आहे. मात्र सध्या महापालिकेत कोणालाही स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाची आघाडी,युती व महायुती झालेली नव्हती. असे असताना भाजप-शिवसेना महायुतीने ३४ जागा जिंकल्या असून यात भाजप २२ तर शिवसेना शिंदे गटाच्या १२ नगरसेवकांचा समावेश आहे. काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. तर समाजवादी पक्ष सहा, कोणार्क विकास आघाडी चार, भिवंडी विकास आघाडी तीन, अपक्ष एक असे ९० नगरसेवकांचे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी काँग्रेस व भाजप पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहे. भिवंडी महानगरपालिकेत महापौर आमचाच असेल, असा दावा काँग्रेसकडून केला जात असला तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीकडून काही वेगळी खेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असल्याचे चर्चा सुरु झाली आहे. असे असले गेल्या महापौर पदाच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत सुद्धा नगरसेवकांशी अर्थकारण करून फोडाफोडीचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. पक्षीय बलाबल: भाजप-२२,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-३०,शिवसेना (शिंदे )१२, राष्ट्रवादी काँग्रेस(शप )-१२, समाजवादी पक्ष-६, कोणार्क विकास आघाडी-४,भिवंडी विकास आघाडी-३, अपक्ष-१

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600