संपादकीय
निष्ठेचा झाला भारतीय रुपया!
पक्ष वाढवायचा असेल तर साचलेपण दूर करायला हवे. वर्षानुवर्षे तेच नगरसेवक निवडून येत असल्याने त्यांच्या मक्तेदारीला पक्षही मग स्वीकारुन बसतो, परंतु त्यामुळे त्या प्रभागातील कार्यकर्त्यांना मात्र लोकप्रतिनिधी होण्यापासून वंचित रहावे लागते हे लक्षात घेतले जात नाही. अशा उपेक्षित कार्यकर्त्यांची संख्या वाढत जाते आणि त्यांना पक्ष संघटना वाढवण्यात रस रहात नाही. भाजपाने तिकिट वाटप करताना घराणेशाहीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी भाकरी फिरवणे इष्ट असा पवित्रा घेतलेला दिसतो. नवीन चेहऱ्यांना संधी देणे जोखमीचे असते हा गोड गैरसमज त्यांनी दूर केला आहे.
भाजपाने घेतलेल्या निर्णयाचे अन्य पक्षांनीही अनुकरण करायला हवे. तरच साचलेपण दूर होऊ शकेल. आपल्याशिवाय आहेच कोण हा फाजिल आत्मविश्वास कम अंहकार ज्येष्ठांमध्ये येऊ लागल्यामुळे त्यांच्यात नगरसेवक म्हणून दाखवावी लागणारी धडाडी दिसत नाही. ते मतदारांना गृहीत धरू लागतात. या उलट नवीन उमेदवार जनतेवर छाप पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यांना स्वत:ला सिद्ध करायचे असल्याने ते मतदारांच्या अपेक्षांना उतरण्यासाठी प्रयत्न करतात. अशा उमेदवारामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आशेचे किरण दिसू लागतात आणि भावी नगरसेवक म्हणून तेही झोकून देऊन काम करू लागतात. याचा फायदा अखेरीस पक्षालाच होत असतो.
विद्यमान राजकारणात अनेक पक्षांची जी पडझड झालेली दिसते, ती प्रामुख्याने उमेदवारांच्या निवडीमुळे. नेते मोठे होत जातात आणि त्यांच्या जागी कार्यकर्त्यांपेक्षा आपल्या आप्तांना प्राधान्य देऊ लागतात. ही बाब कार्यकर्त्यांना रुचत नसते. पूर्वी ते न बोलता हा अन्याय सहन करीत असत. आता परिस्थिती बदलली आहे. पक्षनिष्ठेची अवस्था भारतीय रुपयाप्रमाणे झाली आहे. पक्षांतर करुन नव्याने आलेले चलनफुगवटा करीत असतात आणि त्यामुळे जुन्यांना किंमत रहात नाही! निष्ठेलीही शेवटी 'शेल्फ-लाईफ' असते. उमेद संपलेले निष्ठावान अनेक पक्षात संधीची वाट बघत रहातात. या निवडणुकीनंतर अनेक जुने-जाणते कार्यकर्ते दिसेनासे होतील. पक्षाकडून होणारी अवहेलना सहन करण्याची त्यांची क्षमता संपलेली असते. चुकीचे उमेदवार निवडून येतीलही, परंतु पक्ष बळकट झाला का असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारात्मक असणार.
एक मान्य करावे लागेल की तिकिट मागणाऱ्यांच्या प्रमाणात एकालाच ते मिळत असते. नेत्यालाही निर्णय घेणे कठीण होते. परंतु पक्षहितासाठी असे निर्णय घेणारा आणि ते योग्य असल्याचे सिद्ध करणारा हाच अंतिमत: खरा नेता असतो.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.