संपादकीय

ॲडव्हान्टेज भाजपा!

ठाणे महापालिका निर्विवादपणे शिवसेना-भाजपा महायुतीच्या ताब्यात आली आहे तर ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर बसणार असला तरी ठाकरे बंधूंच्या ब्रॅण्डचा 'बॅण्ड' वाजण्याइतका दारुण पराभव झालेला नाही. उबाठा आणि मनसे यांच्या वाट्याला ३०/४० जागा येतील हा एक्झिट पोलचा अंदाज चुकला असून मुंबईत महायुतीवर अंकुश ठेवण्यासाठी एक सबळ पर्याय ठाकरेंमुळे निर्माण झाला आहे. महायुतीचाच महापौर होईल या दाव्यात बदल करताना तो भाजपाचाच असेल अशी घोषणा प्रवक्त्याने वृत्तवाहिनीतील  कार्यक्रमात दिली. ठाकरे परिवारासाठी मुंबईचे सत्ताकेंद्र हातातून जाणे त्यांच्या पुढील भवितव्यासाठी चांगले नाही. अर्थात वाईटातून चांगले होते म्हणतात ते लक्षात घेतले तर राज ठाकरे यांच्याशी झालेले मनोमिलन सत्ता हातातून निसटल्याची भरपाई करील. या निवडणुकीत सातत्याने एमएमआर क्षेत्राचा विषय निघाला होता. सर्व सहा पालिका भाजपा-शिवसेना यांच्या ताब्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निर्विवाद बहुमत ठाण्यात मिळाल्याने बालेकिल्ला शाबूत राहिला असे म्हणता येईल. परंतु ठाकरे बंधूंची जादू ठाण्यात चालली नाही. याचा दोष स्थानिक नेत्यांना देण्यापूर्वी ठाकरेबंधूंनी संयुक्त प्रचारात केलेला विलंब हे कारण अधिक आहे. जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत या दोघांनी वातावरणनिर्मिती करायला हवी होती. मनसे आणि काँग्रेस यांना खाते उघडता आले नाही तर दोन राष्ट्रवादींच्या भांडणाचा लाभ एआयएमआयएमने घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरी समस्यांचा ऊहापोह व्हावा ही अपेक्षा धर्माचा वापर केल्यामुळे कमी होणे चांगले नाही. हिंदू असो वा मुस्लिम, दोघांनाही पाणी, वाहतूक कोंडी, आदी समस्यांना समप्रमाणात सामोरे जावे लागत असते. नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईकांचे वर्चस्व सिद्ध झाले. तिकडे युती नव्हती आणि तरीही नाईकांनी आपला टांगा जोरात पळवला! शिंदे-नाईक वाद हे या निवडणुकीला लागलेले गालबोट होते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात त्यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी पक्षातीत भूमिका घेणे अपेक्षित आहे. निवडणूक संपल्यावर ही अपेक्षा पूर्ण होईल ही आशा! पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांना भाजपाने जोरदार धक्का दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही ही अवस्था झाली. श्री. अजित पवार आणि श्री. एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या राजकारणातील स्थान थोडे कमकुवत झाले आहे. भाजपा, भले महायुतीच्या बाता करील, परंतु या दोन घटक पक्षांना यथावकाश धोके संभवतात. त्यामुळे शिंदे-पवार यांना व्युहरचना बदलावी लागणार असे वाटते. एमएमआर क्षेत्र पूर्णपणे भगव्याच्या हातात राहणार आहे. त्यामुळे राज्य शासनाचा मदतीचा हात या क्षेत्रातील भव्य प्रकल्पांना लाभणार यात वाद नाही. थोडक्यात, 'डबल-इंजिन'च्या मदतीने ठाणे जिल्ह्याला विकासाचे दिवस येतील, परंतु या गाडीचे सारथ्य मात्र भाजपाकडेच गेले आहे.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600