जिल्हा
ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला!
ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला!
फोटो: ठाणे वैभव
* नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये कमळ फुलले
* कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर मध्ये महायुतीच्या ताब्यात येणार
* भिवंडीत त्रिशंकू परिस्थिती
ठाणे: ठाणे महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप महायुतीचा भगवा फडकणार असून महायुतीने १००पेक्षा जास्त जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांच्या ७५ जागा निवडून आल्या आहेत तर भाजपाच्या पदरात २८ जागा पडल्या आहेत. काँग्रेस आणि मनसेला या निवडणुकीत खातेही खोलता आले नाही. ठाकरे गटाला एक तर मुंब्रा भागातून एमआयएमने बाजी मारत पाच जागांवर विजय मिळवला आहे.
महापालिकेच्या १२५ जागांकरिता काल मतदान घेण्यात आले होते. ५५. ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळी ११ ठिकाणी मतमोजणी घेण्यात आली. पहिला निकाल प्रभाग १९चा लागला येथून शिवसेनेचे विकास रेपाळे, राजेंद्र फाटक, नम्रता भोसले आणि मिनल संख्ये भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. प्रभाग १३ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहाजी खुस्पे यांनी शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव केल्याने ते जायंट किलर ठरले. भारतीय जनता पक्षाच्या नौपाडा भागातील चारही उमेदवारांनी बाजी मारली. पूर्व भागातील भाजपाचे भरत चव्हाण हे चौथ्यांदा महापालिकेवर निवडून आले आहेत. राबोडी भागातून नजीब मुल्ला सहाव्यांदा विजयी झाले आहेत. अजित पवार गटाच्या नऊ जागा निवडून आल्या आहेत.
मागिल काही दिवस चर्चेत असलेल्या घोडबंदर भागातील प्रभाग ३ मधील प्रतिष्ठेच्या निवडणुकीत माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. त्यांनी सर्व पॅनेल निवडून आणले आहे. प्रभाग २२ येथे अपक्ष उमेदवार विकास दाभाडे यांनी शिवसेनेचे पवन कदम यांना कडवी लढत दिली. श्री. कदम यांनी बाजी मारली. मुंब्रा येथे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भांडणात एमआयएमने बाजी मारली असून त्यांचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत तर काँग्रेसने मते खाल्यामुळे उबाठाचे सुमारे आठ ते दहा उमेदवार पराभूत झाले. प्रभाग ११मधून उबाठाच्या महेश्वरी तरे यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला तर माजी खा. राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. राजन किणी यांच्या घरातील तीन सदस्यांचा पराभव झाला असून राजन किणे मात्र विजयी झाले आहेत. या निवडणुकीत प्रभाग २३ मधून प्रमिला केणी या एकमेव अपक्ष महापालिकेत विजयी झाल्या आहेत. त्यांचा मुलगा मंदार केणी हा शिवसेनेतून महापालिकेवर गेला आहे. अपक्षांचा मोठा बोलबाला झाला होता, परंतु श्रीमती केणी वगळता कोणालाही यश मिळाले नाही. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे अभिजित पवार यांनी प्रभाग ९मधून मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील यांचा पराभव करून तेही जायंट किलर ठरले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महापालिकेत १२ नगरसेवक निवडून आले आहेत. दिवा येथिल तीन प्रभागांतील अकराच्या अकरा जागेवर महायुतीने विजय मिळवला असून या विजयाचे शिल्पकार माजी उपमहापौर रमाकांत मढवी ठरले आहेत. त्यांची मुलगी साक्षी देखील विजयी ठरली आहे. ॲड.आदेश भगत, अर्चना पाटील हे देखील विजयी झाले. शिवसेनेचे माजी उपमहापौर गणेश साळवी यांची मुलगी चंद्रकांता साळवी ही प्रभाग २५मधून विजयी झाली आहे.
ठाणे महानगरपालिका: एकूण जागा-१३१, प्रभाग-३३, एकूण उमेदवार-६४१, पक्षीय बलाबल: भाजप-२८, शिवसेना (शिंदे)-७५, राष्ट्रवादी (अजित पवार)-९, मनसे-०, काँग्रेस-०, शिवसेना (उद्धव ठाकरे)-१, राष्ट्रवादी (शरद पवार)-१२, एमआयएम-५, अपक्ष-१
ठाणेकरांचे आभार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून दिल्याबद्दल ठाणेकरांचे आभार मानले आहेत. ठाण्याचा विकास करण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचे सांगितले तर आम्ही कमी जागा लढवून सुद्धा आमचा स्ट्राईक रेट चांगला झाल्याची प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाणेकरांच्या आणि ठाण्याच्या विकासाकरिता आम्ही कटीबद्ध आहोत. त्यांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्याकरिता जीवाचे रान करू, असेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600