जिल्हा
'वीजप्रयोग' भिवंडी, मुंब्र्यात; टोरंट-अदानी आता ठाण्यात?
ठाणे, कल्याण, नवी मुंबईत वीज वितरणासाठी मागितली परवानगी
ठाणे : भिवंडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील वीज ग्राहकांचा प्रचंड विरोध असलेली टोरंट आणि अदानी या दोन कंपन्यांनी ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथे वीज पुरवठा करण्याची परवानगी वीज नियामक मंडळाकडे मागितली आहे.
वीज वितरण नियामक आयोगाचे सचिव डॉ. राजेंद्र आंबेकर यांनी मराठी आणि इंग्रजी वर्तमान पत्रात जाहिरात दिली असून या दोन कंपन्यांनी ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई येथे वीज वितरण कंपनीबरोबर त्यांनाही वीज वितरण सेवा पुरविण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याबाबत नागरिकांकडून वीज नियामक आयोगाने १६ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत त्यावर १९ जुलैपर्यंत उत्तर दिले जाणार असल्याचे जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २२ जुलै रोजी दिलेल्या हरकतींवर विडिओ कॉन्फरेन्सद्वारे सुनावणी घेण्यात येणार असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणले आहे.
भिवंडी, कळवा, मुंब्रा या भागातील वीज वितरण कंपनीची वीज वसुली कमी होते. या भागात मोठ्या प्रमाणावर वीजचोरी होत होती. यास आळा घालण्यासाठी या भागात टोरंट कंपनी ला वीज बिल वसुल करण्याची फ्रेंचायजी दिली होती. त्याला या भागातील नागरिक मागिल अनेक वर्षे विरोध करत आहेत. दरम्यान या भागातील वीजगळती थांबली असून वीज ग्राहकांना नियमित वीज पुरवठा देखिल होत असल्याचे प्रामाणिक ग्राहकांचे म्हणणे आहे.
यावेळी टोरंट आणि अदानी वीज कंपनीने राज्य वीज वितरण कंपनीप्रमाणे सेवा देण्याची तयारी दाखवली असून त्याचा ठेका द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याला विरोध असणाऱ्यांनी आणि पाठिंबा असणाऱ्यांनी हरकती आणि सूचना देण्याचे आवाहन जागरूक ठाणेकरांनी केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600