जिल्हा
घोडबंदरवर रात्री १२ नंतरच जड-अवजड वाहनांना प्रवेश
* वेळेचे बंधन न पाळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
* वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची कठोर पावले
ठाणे: घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंतच जड-अवजड वाहने सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले. रात्री बारापूर्वी वाहने सोडणाऱ्या आणि वेळेच बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना दिले.
घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीमुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे. त्यांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या. त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याचे नियोजन करण्यासही सांगितले. यावेळी श्री. शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलिस आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक, मीरा-भाईंदर पोलिस आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी जेएनपीटीकडून घोडबंदर रस्त्यावर येणारी वाहने रात्री १२ नंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या तसेच याबाबत नियोजन करण्याबाबत नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त श्री. काकडे यांना सांगितले.
मीरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त निकीत कौशिक, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. देशमुख यांना दूरध्वनीवरून अहमदाबादकडून घोडबंदर रोडकडे येणारी वाहनेही रात्री १२ नंतर सोडण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याबरोबर या जड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी या ठिकाणी पार्किगची व्यवस्था करून जड वाहनांचे नियोजन करावे असे सांगितले.
या सर्व यंत्रणाच्या समन्वयाची जबाबदारी ना. शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्री. पांचाळ यांच्यावर सोपविली असून यामध्ये वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वाहतूक पोलिस शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट, पोलिस उप आयुक्त प्रशांत कदम आणि जस्टीस फॅार घोडबंदर रोडचे पंकज सिन्हा, गिरीष पाटील आणि ऍड. राधिका राणे आदी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600