जिल्हा

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्कृष्टता आवश्यक

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्कृष्टता आवश्यक
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्कृष्टता आवश्यक फोटो: ठाणे वैभव
* 'दृष्टी २०२५' कार्यक्रमात डॉ.दीपा भाजेकर यांचे प्रतिपादन
* वावीकर आय इन्स्टिट्यूट व ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त उपक्रम
ठाणे:कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्कृष्टता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपण ज्या करिअरची निवड करतो त्या क्षेत्रात उत्कृष्टता साधल्यास कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते. आवडीचे करिअर निवडल्यास प्रत्येक दिवस नव्या ऊर्जेने सुरू होतो, असा स्वतःचा अनुभव प्रसिद्ध फूड सायंटिस्ट डॉ. दीपा भाजेकर यांनी विद्यार्थ्यांशी शेअर केला.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशादर्शन आणि प्रेरणा देण्याच्या उद्देशाने वावीकर आय इन्स्टिट्यूट व ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दृष्टी २०२५’ हा भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध फूड सायंटिस्ट डॉ. दीपा भाजेकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना यश, उत्कृष्टता आणि आत्मविश्वासाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे ‘दृष्टी २०२५’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा ठोस व्यासपीठ ठरला.
डॉ. दीपा भाजेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण हे मार्गदर्शन करते; मात्र कौशल्य, हुशारी आणि मेहनत याशिवाय यश शक्य नसते, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, आपल्या ताकदी व कमकुवतपणाची जाणीव ठेवणे आणि इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही वर्षे आपल्या आवडीच्या क्षेत्रासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
याशिवाय, कोणत्याही यशस्वी व्यावसायिकासाठी साहस, धोके स्वीकारण्याची तयारी, आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची क्षमता हे पाच महत्त्वाचे गुण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक व कौटुंबिक मूल्यांची जाणीव करून देत, आयुष्यात येणाऱ्या विशेष स्त्रीचा सन्मान करा, तिला फुलासारखे जपा आणि फुलू द्या, असा भावनिक संदेश दिला.
तरुणांच्या विचारांना दिशा देणारा, त्यांना करिअर, व्यक्तिमत्त्व विकास तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे पश्चिम येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या भव्य ऑडिटोरियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600