जिल्हा
मिनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याने ठाण्यातील शिंदे गटात खळबळ
मिनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याने ठाण्यातील शिंदे गटात खळबळ
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू समजल्या जाणार्या माजी महापौर आणि महिला जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीत आपण काम करण्यास असमर्थ असल्याचे कारण देत मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेच्या माध्यमातून शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे स्पष्ट झाले असून त्याची पहिली ठिणगी पडली आहे.
ठाण्यात महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीची घोषणा झाली असतानाच शिवसेना पक्षातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचाही धडाका सुरू आहे. या सर्व प्रक्रियेत माजी महापौर आणि महिला आघाडी जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांचा सक्रीय सहभाग होता. अशातच गुरुवारी सायंकाळी अचानक त्यांचा राजिनामा समाजमाध्यमांवर झळकला. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे या राजिनाम्यामागे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पण यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे.
शिवसेनेच्या फायरब्रॅण्ड म्हणून मिनाक्षी शिंदे यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे एका वरिष्ठ पदाधिकार्याने सांगितले.
मनोरमा नगर प्रभाग हा सध्या वादाचा विषय बनला आहे. या प्रभागातून भूषण भोईर निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. ते येथील स्थायिक नसल्याने त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. हा विरोध काही दिवसांपूर्वी एका कार्यकर्त्याने उघडपणे जाहिर केल्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे मिनाक्षी शिंदे दुखावल्या गेल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600