जिल्हा
बिबट्याच्या हल्ल्यात जखमींचा खर्च वनविभागातर्फे
बिबट्याच्या हल्ल्यात जखमींचा खर्च वनविभागातर्फे
फोटो: ठाणे वैभव
वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा
भाईंदर: शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात अचानक एका बिबट्याने पारिजात इमारतीत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या उपस्थितीमुळे संपूर्ण संकुल आणि आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. या घटनेत काही लोक जखमी झाले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच,वन विभागाचे पथक घटनास्थळी उशिरा पोहोचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते रुग्णालयात गेले. त्यांनी जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
वनमंत्र्यांनी किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली, तर गंभीर जखमी झालेल्या अंजलीला पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बोलताना गणेश नाईक म्हणाले की, शहरी भागात अशा घटना घडणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. भविष्यात अशा घटनांवर तत्काळ लक्ष ठेवता यावे यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्कॅनिंग आणि देखरेख वाढवून शहराची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
वन्यजीव निवासी भागात घुसण्याच्या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600