जिल्हा
चित्रपट रसिकांची 'आराधना' 'आयकॉनिक्स'मध्ये पूर्ण
चित्रपट रसिकांची 'आराधना' 'आयकॉनिक्स'मध्ये पूर्ण
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ५० वर्षांपूर्वी बॉलिवूड चित्रपटांचे सुवर्णयुग पाहिलेल्या ठाण्यातील आराधना टॉकीजने आता आधुनिकतेचा साज चढवला असून आयकॉनिक्सच्या रुपात चित्रपट रसिकांची 'आराधना' पूर्ण होणार आहे. उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
ठाण्यातील नौपाडा परिसरातील जुने आराधना सिनेमागृह १९७६ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी हे सिनेमगृह प्रसिद्ध झाले होते. येथे अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले आणि स्थानिक प्रेक्षकांना चित्रपटांचा खरा आनंद दिला. दरम्यान काही कारणास्तव २००३च्या दरम्यान तेथे चित्रपट प्रदर्शन बंद झाले होते, पण आता नव्या रूपात, नव्या ढंगात आयकॉनिक्स सिनेमा या नवीन नावासरशी ते पुन्हा सुसज्ज झाले आहे.
नव्या आयकॉनिक्समध्ये दोन स्क्रीन असून स्क्रीन १ मध्ये १७१ आणि स्क्रीन २ मध्ये १९३ आसन संख्या आहे. अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, पूर्णपणे डिजिटल स्वरूपात बॉक्स ऑफिस आणि खवय्यांसाठी पिझ्झा, बर्गर, मोमोस, पॉप कॉर्न, कॉफी, चहा, नाचोस इत्यादी सहित कॅफे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
चित्रपटगृहाच्या इमारतीमध्ये व्यावसायिक दुकाने व वाणिज्य कार्यालये असून पार्किंगसाठी बहूमजली टॉवर उभारण्यात आला आहे. या इमारतीची संकल्पना आणि डिझाईन हे ठाण्यातील नामांकित वास्तुविशारद मोलॉय बक्षी यांनी केले आहे तर इमारतीचा विकास मे. आराधना लाईफस्पेस एल एल पी यांनी केला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600