जिल्हा
एका रात्रीत पाच रूग्ण दगावले; आव्हाडांची टीका
कळवा रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात
ठाणे: गुरुवारी दिवसभरात ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांनी पदाधिकाऱ्यांसह धाव घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत रुग्णालयात आढळलेल्या त्रुटी आणि भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत आ.जितेंद्र आव्हाड यांनी पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर कळवा रुग्णालयातील प्रशासनावर आरोप करतानाच महापालिका प्रशासनावरही ताशेरे ओढले. शहरातील रंगरंगोटी आणि रोषणाईवर खर्च करून शहर स्मार्ट होणार नाही, त्यासाठी शहराची आरोग्य व्यवस्थाही सक्षम करावी लागते, असा टोला त्यांनी लगावला.
दररोज शेकडो रुग्णांची वर्दळ असलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी माजली आहे. बेड नसल्याचे कारण सांगून रूग्णांना दाखल करून घेतले जात नाही. परिणामी दूरवरून आलेल्या रुग्णांवर उपचार होतच नाहीत. गुरूवारीही तसाच प्रकार सुरू असल्याची माहिती येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना फोनवरून दिली. ही माहिती मिळताच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी तडक छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय गाठून पाहणी केली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आदी उपस्थित होते.
श्री.आव्हाड म्हणाले की, गुरूवारी रात्री मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात गेलो, तेव्हा, रूग्णालयात कुत्रे फिरताना दिसत होते. या कुत्र्यांनी रूग्णालयात घाण केलेली दिसत होती. रूग्णांना बाहेर बसण्यासाठी जे कठडे तयार केले आहेत, त्यावरही रूग्ण झोपले होते. त्यावर झोपलेल्या एका रुग्णाने आपल्याकडे 12 तास कोणीही लक्ष दिलेले नाही, असे सांगितले. डाॅक्टरांशी रुग्णाने संवाद साधल्यावर आता वेळ नाही, उद्या ये असे सांगितले जाते. मृत्यू हा सांगून येत नाही. त्यामुळेच डाॅक्टरांची उपलब्धता 24 तास असावी, असा अलिखित नियम आहे. पण, इथे सर्व बोंबाबोंब आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालयात पंख्याखाली बेड देण्यासाठी चक्क 500 रूपये मागितले जात आहेत. रूग्णालयात जेवणासाठीही रूग्णांना घरातून वाडगे आणायला सांगितले जाते. 30 टक्के कमीशन मिळवण्यासाठी रक्त, लघवी, विष्ठा बाहेरून तपासून आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते.
आपण सन 2014 मध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना हे रूग्णालय शासनाकडे वर्ग करावे, असे सुचवले होते. कारण, आज सायन, केईएम, नायर आणि जेजे या रूग्णालयात उत्कृष्ट सेवा मिळत आहे. त्यामागे शासनाची यंत्रणाच महत्वपूर्ण ठरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रस्तावास अनुकूलता दर्शविली होती. पण, तो प्रस्ताव पुढे सरकलाच नाही. आजची या रुग्णालयाची अवस्था पाहून असे वाटते की, गरिबांना जगण्याचा अधिकार नाही का? गरिबांना उत्तम आरोग्य व्यवस्था मिळवण्याचा अधिकार नाही का? येथील सुतिकागृहात गरोदर महिला खुर्चीवर बसलेल्या असतात. तिथेच रक्तस्राव होऊन अनेक गर्भवती दगावतात. आपण आपल्या शहराचे उत्तरदायित्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे, अशी विनंती श्री.आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600