जिल्हा
देवानंद थळे यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे साकडे
देवानंद थळे यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे साकडे
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांना पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी ठाणे ग्रामीण भागातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे.
सेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी सेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक हे सुद्धा इच्छुक आहेत, त्यामुळे आता ही उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी नगरसेवक व शिवसैनिकांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. भिवंडी तालुक्यातील कशेळी गावचे रहिवासी माजी नगरसेवक, एमएमआरडीए सदस्य व शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यांत शिवसेना पक्ष बळकट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच आगामी होणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी जिल्हाप्रमुख देवानंद थळे हे सक्रिय झाले असुन कार्यकर्ते व सदस्यांसोबत यासाठी बांधणी करीत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्ष बळकट करणेसाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसैनिक व नागरिकांकडून होत आहे. थळे हे पक्ष स्थापनेपासून पक्षासाठी काम करीत आहेत.
ग्रामपंचायत व जिल्हा परिषद गटातील सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षबांधणी करीत आहेत. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली तर ग्रामीण भागात पक्षाची वाटचाल अधिक जोमाने होऊन संघटनेला त्याचा फायदा होऊ शकतो, असे मत शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. या मागणीसाठी ग्रामीण परिसरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच पक्ष प्रमुखांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600