जिल्हा
डोंबिवलीतील माजी नगरसेवक दांपत्याचा भाजपला रामराम
डोंबिवलीतील माजी नगरसेवक दांपत्याचा भाजपला रामराम
फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा प्रभागाचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे (माजी नगरसेविका) यांनी बुधवारी भाजप कल्याण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे भाजप पदाधिकारी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या दीड वर्षापासून विकास म्हात्रे भाजपमध्ये अस्वस्थ होते. वेळोवेळी त्यांनी विविध कारणांवरून आपली नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि इतर नेत्यांनी विकास म्हात्रे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. विकास म्हात्रे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. काही वर्षापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना गटनेते, स्थायी समिती सभापती पद दिले होते.
मागील तीन वर्षाच्या कालावधीत गरीबाचापाडा प्रभागातील रस्ते, इतर विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे यांना दिला होता. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपला विकास म्हात्रे यांची भूमिका संशयास्पद वाटत होती. त्यामुळे विकास म्हात्रे भाजपला रामराम ठोकणार अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती.
विधानसभा निवडणुकीपासून विकास म्हात्रे यांचा ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्याबरोबर मैत्री वाढली. त्याच बरोबर काटईच्या एका शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून विकास म्हात्रे शिंदे गटाशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होते.
ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने भाजपचा एक पदाधिकारी ठाकरे गटात रविवारी पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विकास म्हात्रे यांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्चित मानला जात आहे.
कोरोना काळात आपण स्थायी समिती सभापती म्हणून समर्पित भावाने काम केले. भाजपचा गटनेता, स्थायी समिती सभापती पदे आपण भूषवून विविध विकास कामे मार्गी लावली आहेत, असे म्हात्रे दाम्पत्याने पत्रात म्हटले आहे. दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांनी विकास म्हात्रे यांचे मन वळविण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600