जिल्हा
कोकणात जाणाऱ्यांसाठी धावणार चार वातानुकूलित विशेष रेल्वे
मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वेने वाढती गर्दी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर चार वातानुकूलित विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रामुख्याने या विशेष रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-मडगाव (गोवा) दरम्यान धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या चार रेल्वेगाड्याच्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
गाडी क्रमांक ०११२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव वातानुकूलित विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी १० आणि १४ एप्रिल रोजी रात्री १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि मडगाव येथे ११ आणि १५ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी १० आणि १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ३.४५ वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला १८ वातानुकूलित तृतीय श्रेणीचे इकॉनॉमी डबे व २ जनरेटर व्हॅन अशी संरचना असेल. गाडी क्रमांक ०११२९ साठी सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी या संकेतस्थळावर आरक्षण उपलब्ध आहे, अशी माहिती मध्य आणि कोकण रेल्वेने दिली.
या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबणार असल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, कोकणासाठी अजूनही अधिक गाड्यांची गरज असल्याची मागणी स्थानिकांकडून होत असून, भविष्यात आणखी सेवा वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उन्हाळी सुट्ट्या, सणासुदीचा काळ आणि पर्यटन हंगाम लक्षात घेता रेल्वेने ही अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे मुंबई-कोकण प्रवास अधिक सुलभ, आरामदायी आणि नियोजनबद्ध होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या गाड्यांमध्ये वातानुकूलित डब्यांचा समावेश करण्यात येणार असून, लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ही सेवा विशेष सोयीची ठरणार आहे. यामुळे सामान्य गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600