जिल्हा
लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून सव्वा चार लाखांची फसवणूक
ठाणे : तुम्हाला 36 लाखाची लॉटरी लागली आहे. ही बक्षीस रक्कम लवकरच तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे आमिष दाखवून चार लाख 26 हजाराची रक्कम बँकेच्या खात्यात वेळोवेळी जमा करण्यास लावून फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट येथे राहणारे अजमल अबर खान (23) यांना 10 मे ते 26 मे 2023 या काळात मोबाईलफोनवर एक मॅसेज आला होता. त्यात आयफोन व आयपॅडचे बक्षीस लागल्याचे नमूद होते व खाली एक संपर्क क्रमांक दिलेला होता. त्या क्रमांकावर अजमल यांनी फोन केला असता फोनवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तुम्हाला 36 लाखाची लॉटरी लागली असल्याचे सांगितले. 36 लाखाची रक्कम तुम्हाला मिळेल पण त्याआधी तुम्हाला आमची काही फी भरावी लागेल असे सांगत फोन करणाऱ्या व्यक्तीने अजमल यांना काही हजारची रक्कम त्यांच्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार अजमल याने वेळोवेळी 4 लाख 26 हजार रुपये इतकी रक्कम फोन करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा केली.
दरम्यान ज्या क्रमांकावरून अजमल यांना फोन कॉल्स येत होते ते फोनच बंद झाले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी वागळे स्टेट पोलिस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा 31 मे 2023 रोजी दाखल केला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600