जिल्हा
ठामपा देणार विनामूल्य शाडू माती, मूर्ती घडविण्यासाठी जागा
मूर्तिकारांना अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे: पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे नियोजन करण्यासाठी, मूर्तीकारांनी शाडूची मातीची पुढील १५ दिवसात ठाणे महापालिकेकडे मागणी नोंदवावी. तसेच, जागेसाठी अर्ज करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
पर्यावरण पूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तीकार तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची १६ जानेवारी रोजी बैठक घेतली. तसेच, ३ फेब्रुवारी रोजी पर्यावरण पूरक गणेशोत्सव नियमावली २०२५ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मूर्तीकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसेच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा. त्यानुसार, पर्याप्त वेळेत शाडूची माती उपलब्ध करणे शक्य होईल. तसेच, जागांसाठी अर्ज आल्यावर त्यानुसार प्रभाग निहाय जागा शोधून त्या मूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी विनामूल्य देता येतील, असे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.
शाडूच्या मातीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग येथे तर जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे. तरी संबंधित मूर्तीकारांनी या दोन्ही गोष्टी पुढील १५ दिवसांत कराव्यात, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600