जिल्हा
स्वातंत्र्यसैनिक वसंत नाचणे यांचे निधन
स्वातंत्र्यसैनिक वसंत नाचणे यांचे निधन
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्र दलाचे ज्येष्ठ नेते, वसंत नाचणे यांचे वयाच्या नव्याण्णवव्या वर्षी निधन झाले.
स्वातंत्र्य लढ्यात आपल्या ऐन तारुण्यात, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, दत्ताजी ताम्हाणे यांच्या बरोबरीने त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. ठाण्यातील मासुंदा तलाव स्वच्छ करण्यासाठी १९४३ ते १९४५ ही तीन वर्षे विविध संस्थांमधील तरुणांना एकत्र करून श्रमदान करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
स्वातंत्र्य मिळाल्यावर, रिझर्व बँकेत नोकरी करीत, राष्ट्र सेवादलाच्या मुंबई कचेरीचा कारभार बघत असत. इंटरनॅशनल सोशल फोरमचे ते सभासद होते. विविध देशात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भारत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. रिझर्व बँकमधून निवृत्त झाल्यावर समाजवादी पक्षाच्या पंचायत मासिकाचे त्यांनी वीस वर्षे संपादन केले होते.
वसंत नाचणे यांच्या अंत्यविधीला राज्य सरकारच्या वतीने मान चक्र आणि फुलांचा हार स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी राज्य शासनाचे वतीने हजर राहून श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी ठाण्यातील सेवा दलातील असंख्य कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात वसंत नाचणे यांचा शतकमहोत्सवी जन्मदिन करण्याचे त्यांच्या निकटच्या नातेवाईकांनी ठरवले होते, हा योग चुकला याची हळहळ सर्व उपस्थित व्यक्त करीत होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600