जिल्हा
ठाण्यात आजपासून कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला
ठाण्यात आजपासून कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समिती यांच्या विद्यमाने ठाणे शहरात ८ ते १४ जानेवारी सात दिवसांची कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला २०२६ दररोज रात्रौ ८ वाजता सरस्वती सेकंडरी स्कूलचे पटांगण, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, महात्मा गांधी मार्ग, नौपाडा, ठाणे येथे उत्साहात होणार आहे. व्याख्यानमाला यंदा ४० व्या यशस्वी वर्षात पदार्पण करीत आहे.
गुरुवार ८ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे उदघाटन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून होईल.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 'वंदे मातरम' आणि राष्ट्रीय पुनुरुत्थान या विषयावरील परिसंवादाने होईल. या परिसवांदात राष्ट्रीय प्रवक्ते भाजपा शहजाद पूनावाला आणि पत्रकार किरण तारे, डॉ. राजीव पुरी, मिलिंद भागवत सहभागी होतील.
शुक्रवार ९ जानेवारी रोजी दुसरे पुष्प प्रख्यात वैद्यकीय अनुवंश शास्त्रज्ञ डॉ. कौमुदी गोडबोले (दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे) अनुवंशकितेतून येणारे आजार व उपाय या विषयात प्रबोधन करतील.
शनिवार १० जानेवारी रोजी तिसरे पुष्प गुंफण्यासाठी सुमेधा चिथडे या 'राष्ट्रायस्वाहाः इदं न मम' या अंतर्गत भारतीय सैन्य आणि त्यांचे राष्ट्राप्रती योगदान या विषयात आपले विचार मांडतील.
रविवार ११ जानेवारी रोजी चवथे पुष्प गुंफण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा विभाग प्रमुख उपेन्द्र कुलकर्णी उपस्थित राहतील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षनिमित्त आढावा मांडतील. सोमवार १२ जानेवारी रोजी पाचवे पुष्प गुंफण्यासाठी अक्षय जोग उपस्थित राहणार असून पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी आपले विचार व्यक्त करतील.
मंगळवार १३ जानेवारी रोजी सहावे पुष्प गुंफण्यासाठी आय.आय.एम. शिलाँग न्यासी मंडळ सदस्य तसेच अमेझिंग नमस्ते फाऊंडेशन, गुवाहाटी या संस्थेचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी विकासाच्या वाटेवरील पूर्वांचल या विषयात आपले मनोगत व्यक्त करतील.
बुधवार १४ जानेवारी रोजी सातवे आणि अंतिम पुष्प गुंफण्यासाठी ख्यातनाम अभिनेता योगेश सोमण (संचालक, कला अकादमी मुंबई विद्यापीठ, उरी चित्रपटातील तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भूमिका आणि 'अभंग तुकाराम'मध्ये तुकोबाची प्रमुख भूमिका साकारणारे) उपस्थित राहणार असून 'चित्रपटसृष्टीची बदलती परिभाषा' या विषयात आपले विचार व्यक्त करतील.
केवळ ठाण्यातील नव्हे तर आसपासच्या शहरातील रसिक श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादामुळे व्याख्यानमाला ४० व्या वर्षात निश्चित यशस्वी होईल. रसिकांनी या ज्ञानयज्ञ सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व सचिव शरद पुरोहित यांनी केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600