जिल्हा
ठाणे पालिकेच्या मराठी शाळेत गुजराती शिक्षक?
ठाणे पालिकेच्या मराठी शाळेत गुजराती शिक्षक?
फोटो: ठाणे वैभव
शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या दाव्यामुळे खळबळ
ठाणे: ठाणे महापालिकेच्या मराठी शाळेत गुजराती माध्यमाचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा प्रकार शिंदे सेनेच्या नगरसेवकाने सर्वसाधारण सभेत उघडकीस आणला. तासिका तत्त्वावर नियुक्त केलेले शिक्षक शैक्षणिक पात्रतेविनाच विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणावरून पालिकेच्या शिक्षण विभागाला फैलावर घेतले.
ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. या सभेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनिल भोर यांनी ठाणे महापालिकेतील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिक्षण विभागातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत शिक्षण विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधित विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. ठाणे महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळेत गुजराती माध्यमांचे शिक्षक शिकवत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अनिल भोर यांनी सभागृहात केल्याने खळबळ उडाली आहे. काही शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु या शिक्षकांची आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेली नसतानाही ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
ठाणे पालिकेच्या एका शाळेत वार्षिक परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी होत होती. याबाबत शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्याकडे तक्रारही केली होती. या तक्रारीनंतर त्यांनी संबंधित शाळेची पाहणी करून तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर संबंधित शिक्षकांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
ठाणे महापालिकेच्या प्रत्येक शाळेचे ऑडिट करून शाळा क्रमांक १ पासून पटसंख्येची पडताळणी करण्याची गरज आहे. कारण, बोगस पटसंख्या दाखवून ठेकेदारांकडून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप करत यासाठी जबाबदार कोण, याचा शोध घेण्याची मागणी शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केली. तसेच महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या, माध्यमनिहाय विद्यार्थ्यांची संख्या (मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी) याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600