महाराष्ट्र
पाणी खंडित केल्याने माथाडी-व्यापारी आक्रमक
नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमधील इमारती अतिधोकादायक घोषित केल्या असून त्या रिकाम्या करण्यासाठी बुधवार १९ जून रोजी संपूर्ण नळजोडण्या खंडित केल्या होत्या. परिणामी बाजारातील माथाडी, व्यापारी आणि इतर बाजार घटकांची कुचंबणा होत होती. त्यामुळे पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा म्हणून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी पालिकेवर धडक दिली.
सन २००५ पासून नवी मुंबई महानगरपालिका कांदा-बटाटा बाजारमधील इमारती धोकादायक यादीत समाविष्ट करत आहे. गेले कित्येक वर्षांपासून या बाजार समितीचा पुनर्विकास रखडला आहे. यंदाही नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ही नोटीस देण्यात आली असून ३० वर्षे जुन्या इमारतींचे संरचना परीक्षण देखील करण्याची नोटीस बजावली आहे. परंतु त्याच दरम्यान दुसरीकडे अति धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कांदा-बटाटा बाजार, मॅफको मार्केट आणि मसाला बाजार तसेच प्रशासकीय इमारतीतील नळ जोडणी खंडित केली होती. २० जूनला ही कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून सोमवारपर्यंत येथील बाजार घटकांचे पाण्याविना हाल होत आहेत. येथील व्यापारी, माथाडी, महिला कर्मचारी पाणी उपलब्ध नसल्यास काम कसे करणार? त्यामुळे या विरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सोमवारी बाजार घटकांना एकत्रित करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा देत लवकर पाणी सुरू केले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता.
या आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्त यांनी लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कांदा बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजू मणियार यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600