महाराष्ट्र
किनारपट्टी, पश्चिम घाट परिसरात तीन दिवस पावसाचा जोर
पुणे : किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरातवर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रापासून केरळच्या किनारपट्टीवर हवेची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही हवामानविषयक स्थिती मोसमी पावसासाठी पोषक आहे.
किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसासारखा मेघगर्जना, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्याला नारंगी इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600