जिल्हा
जिल्ह्यात दमदार पाऊस; हुश्शsss पाणीकपात रद्द !
जिल्ह्यात दमदार पाऊस; हुश्शsss पाणीकपात रद्द !
फोटो: ठाणे वैभव
* उल्हास नदीची पातळी वाढली
- स्टेम, एमआयडीसीचा शटडाऊन रद्द
ठाणे : महिनाभर ओढ दिलेल्या पावसाने तोंडचे पाणी पळवले होते, मात्र मागील दोन दिवसांत कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने एमआयडीसीने नियोजित केलेला ४८ तासांचा शटडाऊन आणि ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणाने जाहीर केलेली २पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गेला महिनाभर अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा रोडावला होता. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन एमआयडीसी आणि जलसंपदा विभागाने आठवड्यातून ४८ तासांचा, तर स्टेम प्राधिकरणाने २४ तासांचा शटडाऊन लागू केला होता. त्यानुसार गेल्या काही आठवड्यांपासून ठाणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये २४ ते ४८ तासांची पाणी कपात सुरू होती. जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्र आणि शहाड येथून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार १ ते ३ जुलैपर्यंत ही पाणी कपात लागू होणार होती.
गेल्या काही दिवसांत बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शहाड आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रांवरून आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी उचलणे शक्य झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन एमआयडीसीने यंदाच्या आठवड्यासाठी ४८ तासांचा शटडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत उपअभियंत्यांनी तातडीचे आदेश जारी करून पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती दिली.
एमआयडीसीच्या निर्णयानंतर ठाणे महापालिकेनेही स्टेम प्राधिकरणाकडून होणारी या आठवड्यातील २४ तासांची पाणी कपात रद्द केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या परिसरांनाही दिलासा मिळाला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील आठवड्यांतील पाणी कपातीबाबतही सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600