महाराष्ट्र
आचारसंहितेचे ठाण्यात पडसाद; साडेतीन हजार बॅनर हटवले
ठाणे : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरात जागोजागी लागलेल्या राजकीय मंडळींच्या फ्लेक्स, बॅनर, पोस्टरवर ठाणे महापालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे. ठाणे पालिकेच्या हद्दीत एका दिवसात ३,५६५ बॅनरवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.
ठाणे शहरात आचारसंहितेनंतर चौका-चौकांत लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई केली जात असून, एका दिवसांत साडेतीन हजारहून अधिक बॅनर, फलक, फ्लेक्स, झेंडे काढण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांतील इच्छुकांनी फ्लेक्स, बॅनर लावण्याचा सपाटाच लावला होता. विशेषतः आपल्या प्रभागात नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील संभाव्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती. संपूर्ण शहरभर विविध पक्षातील नेत्यांनी आपल्या वाढदिवसाचे आणि इतर योजनेचे बॅनर लावले होते. त्यामूळे संपुर्ण शहर विद्रूप झाले होते. अखेर, आचारसंहितेमुळे महापालिकेला त्यावर कारवाई करण्याचा मुहूर्त सापडला आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा इच्छुक असेलल्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर दंड आणि निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते.
कारवाई करण्यात आलेल्या बॅनरची संख्या
दिवा - ३६०
ओवळा-माजिवडा - २४४
कोपरी-पाचपाखाडी - ८८३
ठाणे - ६७४
कळवा-मुंब्रा - १४०४
-------------------------
एकूण - ३५६५
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600