जिल्हा
अंबरनाथमध्ये भाजपला युती धर्माचा विसर पडला
अंबरनाथमध्ये भाजपला युती धर्माचा विसर पडला
फोटो: ठाणे वैभव
जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा भाजपावर आरोप
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत भाजपने युतीचा धर्म पाळला नाही, नगरपालिकेत शिवसेनेचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करून सत्ता आल्यास युतीसाठी पुन्हा भेटू नका, असा परखड इशारा कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपला दिला.
अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने खुंटवली भागात गुरुवारी रात्री कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाप्रमुख लांडगे यांनी भाजपवर सडकून टीका केली. उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, माजी उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, नीता बनसोडे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उप मुख्यमंत्री शिंदे युतीचा धर्म पाळतात, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
अंबरनाथमध्ये शिवसेनेचे 45 नगरसेवक निवडून येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. शिवसेनेत गटबाजीला थारा नसून केलेल्या कामातून स्पर्धा असल्याचा निर्वाळा उपजिल्हाप्रमुख लांडगे आणि शहरप्रमुख वाळेकर यांनी दिला.
अंबरनाथमध्ये 1995 पासून शिवसेनेची पालिकेत सत्ता आहे, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ .श्रीकांत शिंदे, यांच्या माध्यमातून शहरात विकास कामे जोमाने झाली, शिवमंदिर आर्ट फेस्टिवल, शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, उद्याने, धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर अशी कामे शहरात झाली, ही कामेच बोलतात, विकास कामे करण्याबरोबरच सामाजिक शैक्षणिक, धार्मिक कार्यात शिवसेना पूर्वीपासून आघाडीवर असल्याचे शहरप्रमुख वाळेकर यांनी सांगितले.
उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, नीता परदेशी, ऍड. निखील वाळेकर, बाळा गायकर आदींची यावेळी भाषणे झाली. आजी-माजी नगरसेवक, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश डावरे यांनी सूत्रसंचालन केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600