जिल्हा
आदेश धुडकावून येऊरमध्ये गटारी जोमात
आदेश धुडकावून येऊरमध्ये गटारी जोमात
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: येऊर येथील वनपरिसरात गटारीकरिता येणाऱ्यांवर निर्बंध लावण्याची वन विभागाची घोषणा हवेत विरली. आज दिवसभर मोठ्या प्रमाणावर मद्य आणि खाद्यप्रेमी गटारी साजरी करण्यासाठी येथे आल्याने घाणीचे साम्राज्य आणि दारूच्या बाटल्याचे दर्शन घडले.
गटारी निमित्ताने मद्यधुंद अवस्थेत गर्दी, गोंगाट, अस्वच्छता आणि निसर्गाची हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने कठोर पवित्रा घेतला होता. २३ आणि २४ जुलै रोजी येऊर वनक्षेत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे जाहीर केले होते या कालावधीत कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, अशी स्पष्ट सूचना वन विभागाने दिला होती, परंतु प्रवेश द्वारावर कोणताही चोख बंदोबस्त नसल्याने येऊरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा सुरू होती.
गेल्या काही वर्षांपासून गटारी निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने येऊरमध्ये गर्दी करत होते. मद्यप्राशन, ध्वनीप्रदूषण, असभ्य वर्तन, जंगलातील नाल्यांमध्ये अंघोळ, प्लास्टिक व काचांचा कचरा यामुळे निसर्गसंपत्ती आणि वन्यजीव धोक्यात येत होते. यामुळेच येऊर वनपरिसरात गटारी साजरी करणे यंदा पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी दिली.
दरम्यान येऊरमध्ये राजकारणी, बिल्डर, उद्योजक तसेच धनदांडग्यांचे शेकडो बंगले, हॉटेल, ढाबे आहेत. याशिवाय येथे विविध विभागांच्या जमिनी आहेत. त्यामुळे येथे दिवसभर शेकडो मंडळींचा राबता असतो. अशात गटारीनिमित्त हे प्रमाण आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडवलेल्या वाहनांना हिरवा सिग्नल देण्यासाठी राजकीय नेत्यांचे आणि फोन येत असल्याने ही वाहने सर्रास ये-जा करत होती. अनेक बंगले, आणि हॉटेल तरुणांनी फुल्ल भरले होते. अनेक ठिकाणी दारूच्या पार्ट्या बिनधास्त सुरु होत्या. त्यामुळे वनविभागाची घोषणा फुसकी ठरल्याची टीका पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600