जिल्हा
पहिल्याच पावसात दिव्यातील रस्ते पाण्याखाली, नालेसफाईचा बोजवारा
पहिल्याच पावसात दिव्यातील रस्ते पाण्याखाली, नालेसफाईचा बोजवारा
फोटो: ठाणे वैभव
अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई करण्याची ज्योती पाटील यांची मागणी
ठाणे: बुधवारी झालेल्या पावसाने दिवा शहरातील नालेसफाईची पोलखोल केली. दिवा शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला.
दिवा शहरात नालेसफाई झाली नसल्याचा आरोप शिवसेना शहर संघटिका ज्योती पाटील यांनी दहा दिवसापूर्वीच केला होता. मात्र याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करत नालेसफाईत चालढकलपणा केला. बुधवारी झालेल्या प्रचंड पावसात दिव्यातील रस्ते जलमय झाले. मुंब्रादेवी कॉलनी, त्याचबरोबर दिवा-आगासन मुख्य रस्ता या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागली. वाहतुकीत देखील अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी वाहने पावसाच्या पाण्यामुळे बंद पडली. दिवा शहरात रस्त्यावर साचलेल्या पाण्याला पूर्णतः पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला संघटिका ज्योती पाटील यांनी केला आहे.
वारंवार मागणी करूनही दिव्यातील नालेसफाईकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याने दिवा शहरातील व्यापारी नागरिक व वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याकडे ज्योती पाटील यांनी लक्ष वेधले आहे. दिवा प्रभाग समितीतील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करून दिवा शहरातील नालेसफाई तातडीने करावी व पाण्याचा निचरा नीट होईल याची व्यवस्था करावी, अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600