जिल्हा
घोडबंदर रोडवर उघड्या डंपर वाहनांचा वाढता धोका
घोडबंदर रोडवर उघड्या डंपर वाहनांचा वाढता धोका
फोटो: ठाणे वैभव
प्रवाशांचा जीव टांगणीला
ठाणे: ठाण्यातील सर्वात वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग समजला जाणारा घोडबंदर रोड सध्या प्रवाशांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत आहे. मेट्रोचे काम आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांना आता उघड्या डंपरमधून होणाऱ्या जीवघेण्या दगड वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. कोणतीही सुरक्षितता न बाळगता, भरधाव वेगाने धावणाऱ्या या डंपरमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
घोडबंदर रोडवरून मोठ्या प्रमाणावर बांधकामाचे दगड घेऊन जाणारे डंपर धावत आहेत. नियमानुसार, अशा प्रकारे बांधकाम साहित्य किंवा दगड वाहून नेताना ते ताडपत्रीने किंवा जाळीने पूर्णपणे झाकलेले असणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक डंपर चालक या नियमांना केराची टोपली दाखवत दगडांचे ढिगारे उघड्यावरच रचून भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत.
घोडबंदर रोडवर वाहनांची संख्या प्रचंड असते. अशातच एखादा दगड डंपरमधून निसटून खाली पडल्यास, मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा जागीच बळी जाऊ शकतो. अचानक दगड पडल्यास मागची वाहने नियंत्रण गमावून साखळी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते अरुंद असल्याने या डंपरच्या बाजूने प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे.
ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असूनही, अशा प्रकारे उघडपणे नियमभंग करणाऱ्या डंपरवर कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस केवळ कागदोपत्री नियम सांगतात की प्रत्यक्ष रस्त्यावर कारवाई करणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
उघड्यावर माल वाहून नेणाऱ्या डंपरवर कडक दंडात्मक कारवाई करावी. अशा वाहनांचे परवाने त्वरित रद्द करावेत. घोडबंदर रोडवर जड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी गस्त वाढवावी, अशा मागण्या नागरिक करत असून
"एखादा निष्पाप जीव जाण्यापूर्वी प्रशासन या 'फिरत्या मृत्यूच्या सापळ्यांवर' लगाम लावणार का?" असा सवाल आता ठाणेकर विचारत आहेत.
“घोडबंदर रोडवर सुरू असलेली उघड्या डंपरमधून दगड वाहतूक ही थेट नागरिकांच्या जीवाशी खेळणारी बेफिकिरी आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या डंपर चालकांवर आणि संबंधित ठेकेदारांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे. एखादा निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहू नये, असे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600