क्रीडा
भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यास उत्सुक
भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यास उत्सुक
फोटो: ठाणे वैभव
इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध कधीही टी-20 मालिका जिंकलेली नसलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे 97 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मोहिमेची सुरुवात दणदणीत केली. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व करणाऱ्या स्मृती मानधनाने तिचे पहिले टी-20 शतक झळकावले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी श्री चरणी हिने तिच्या फिरकीच्या जादूने चार विकेट्स पटकावून प्रभावित केले.
या द्विपक्षीय मालिकेत आणखी चार सामने शिल्लक आहेत. येणाऱ्या चकमकीत, एकीकडे यजमान संघाचे पुनरागमन करण्याचे ध्येय असेल, तर दुरीकडे पाहुण्या संघाला आणखी एका विजय नोंदवण्याची तीव्र इच्छा असेल. मंगळवारी ब्रिस्टलमधील काउंटी ग्राउंडवर दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघ भेटतील.
संघ
इंग्लंड: नॅटली सिव्हर-ब्रंट (कर्णधार), एम अर्लॉट, टॅमी बोमाँट (यष्टीरक्षक), लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डन्कली, सोफी एक्लस्टन, लॉरेन फायलर, एमी जोन्स (यष्टीरक्षक), पेज शोलफिल्ड, लिंसी स्मिथ, डॅनी वायट-हॉज, इस्सी वाँग
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे
आमने-सामने
भारत आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध एकूण 31 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी इंग्लंडने 22 तर भारताने केवळ 9 सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांत इंग्लंड 8-5 ने आघाडीवर आहे.
कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल
नॅटली सिव्हर-ब्रंट: भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या कर्णधाराने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र तिला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. तिचा संघ 113 धावांवरच गुंडाळला गेला. त्या 113 धावांपैकी या उजव्या हाताच्या फलंदाजानेच 66 धावा केल्या, ज्या संघाच्या एकूण धावसंख्येच्या निम्म्याहून अधिक होत्या.
लॉरेन बेल: इंग्लंडच्या या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 4 षटकांत 27 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तिच्या संघासाठी ती त्या सामन्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज असण्यासोबतच, सर्वात किफायतशीर गोलंदाज होती.
स्मृती मानधना: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने चमकदार शतक झळकावले. या शैलीपूर्ण खेळाडूने ताकद आणि नजाकत याचे संतुलन साधून तिच्या सुंदर खेळीची रचना केली. तिने 62 चेंडूत 15 चौकारांच्या आणि तीन षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या.
श्री चरणी: भारताच्या या 20 वर्षीय डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने पदार्पणातच 3.5 षटकांत केवळ 12 धावा खर्च करून 4 विकेट्स पटकावल्या. तिने बाद केलेल्या फलंदाजांमध्ये इंग्लंडची कर्णधार नॅटली सिव्हर-ब्रंट हिचा समावेश होता. श्री चरणीच्या या प्रदर्शनाचे कौतुक भारताची कर्णधार स्मृती मानधनानेदेखील केले.
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 1 जुलै 2025
वेळ: सायंकाळी 11:00 वाजता
ठिकाण: काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल
प्रक्षेपण: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600