जिल्हा
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी!
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी!
फोटो: ठाणे वैभव
महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी तयार होत असून, अशी कंपनी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. या कंपनीअंतर्गत १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार असून, त्यातील तीन हजार मेगावॅटचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. पुढील वर्षाअखेरीस १६ हजार मेगावॅटचे प्रकल्पही कार्यान्वित झालेले असतील, असा दावा करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सौर प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात झाल्याची माहितीही दिली.
सौर ऊर्जेतून पर्यावरणाची हानी थांबणार असून, शेतकऱ्यांना पुढील २५ वर्षे विजेचे बिल लागणार नाही. २४ तास पाणी मिळणार असल्याने पिकं घेण्याची सोयही होणार असून, पुढील वर्षी १० लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असे सांगत फडणवीस यांनी ग्रामीण भागात एक लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावाही केला.
महाराष्ट्रामध्ये एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप बसवण्याच्या उच्चांकाचा जागतिक विक्रम झाला असून, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. त्यानिमित्त प्रमाणपत्र देण्याच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री शुक्रवारी येथे बोलत होते. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील ऑरिक सिटी कार्यालयाच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या मंचावर गिनीज बुकचे परीक्षक कार्ल्स सॅबील, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, आदित्य जीवने आदींसह ऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वीजदर प्रत्येकवर्षी कमी होणार
महाराष्ट्र पुढील पाच वर्षांत प्रत्येक वर्षी विजेचे दर कमी करणार आहे, असे नियामक आयोगाला सांगितले आहे. ९ टक्क्यांनी वाढणारा विजेचा भाव ३ टक्क्यांनी प्रत्येक वर्षी कमी करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600