जिल्हा
मे अखेरपर्यंत घोडबंदर रस्त्यावरील सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश
मे अखेरपर्यंत घोडबंदर रस्त्यावरील सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश
फोटो: ठाणे वैभव
मान्सून काळात सर्व प्राधिकरणांनी सज्ज रहावे-आयुक्त
ठाणे: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेली सर्व कामे ही येत्या 30 मे पर्यंत पूर्ण करावीत. 30 मे नंतर कोणतेही काम घोडबंदर रोडवर सुरू राहणार नाही, यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा, असे निर्देश आज झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणांना दिले.
नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1, संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मान्सून कालावधीत नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष, रेल्वे, कोस्ट गार्ड, पोलीस आणि महापालिकेतील सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवणे. पावसाळयात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर आरोप करु नयेत. सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर रहावे. भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज रहावे. तसेच सर्व विभागांचेआपत्ती व्यवस्थान कक्ष 24x7 कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
बैठकीत अतिवृष्टी, भरती, पूरसदृश्य परिस्थिती, तसेच खड्डे दुरूस्ती, सखल भागात साचणारे पाणी, पंपिंग स्टेशन, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात आला. रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरातील पाणी निचरा, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्याबाबत माहिती दिली. स्टेशन परिसरात ब्लिंकर, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. नागरिकांना वेळेत सूचना मिळाव्यात यासाठी विविध विभागांचे अधिकारी सतत संपर्कात राहून सामूहिक समन्वयाने काम करतील. तसेच मान्सून कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी सुरू ठेवावेत असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीच्या काळात रस्त्यावर खड्डा पडल्यास तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा. रस्ता कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारितील असला तरी नागरिकांना त्रास होवू नये यासाठी मान्सून कालावधीत खड्डा दुरूस्त करण्याची कार्यवाही ठाणे महापालिका करेल असेही आयुक्तांनी नमूद केले. तसेच खड्ड्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमावा तसेच सर्व विभागांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून तत्काळ समन्वय साधून माहितीची देवाणघेवाण ठेवावी, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.
दरवर्षी ज्या सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी पंप बसविण्यात येणार आहेत. या सखल भागाची यादी तयार करावी. पावसाळ्यात सदर ठिकाणचे पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील याची खात्री करावी. तसेच प्रत्येक प्रभागात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी हायड्रा मशीन, पंपिंग यंत्रणा व मनुष्यबळ सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600