जिल्हा
खड्ड्यांचे घाव खारीगावला; कोंडीची वेदना मुंब्रा बायपासला
खड्ड्यांचे घाव खारीगावला; कोंडीची वेदना मुंब्रा बायपासला
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: पावसाने थोडी उसंत घेतल्याने प्रशासनाने मुंब्रा येथे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे मुंब्रा बाह्यवळणावर कोंडी झाली. देवी मंदिर ते काळसेकर रुग्णालयापर्यंत वाहनांचा वेग मंदावून त्याचा फटका ठाण्याच्या दिशेने जाणार्यांना बसला.
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारीगाव टोलनाका येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून त्यामुळे येथे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घेतली आहे. मात्र या कामामुळे बुधवारी खारीगाव टोल नाका ते मुंब्रा देवी मंदिर आणि मुंब्रा बाह्यवळण मार्ग कोंडीत सापडला.
नवीमुंबई, कल्याण, डोंबिवली तसेच उरण जेएनपीटी बंदरातील हजारो अवजड वाहने आणि हलकी वाहने मुंब्रा बाह्यवळण आणि मुंबई-नाशिक महामार्गाने ठाणे, भिवंडी, गुजरात नाशिकच्या दिशेने जातात. या वाहनांना सकाळीच कोंडीचा सामना करावा लागला.
अवजड वाहनांना वेळ मर्यादा दिली आहे. रात्रीच मुंब्रा बाह्य वळणावर आलेली अवजड वाहने अडकून बसली असल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसले. मुंब्रा देवी मंदिर ते काळसेकर रुग्णालयापर्यंत ही कोंडी पोहचली होती. परिणामी ठाणे दिशेने येणारा मार्ग खोळंबला. दुपारपर्यंत ही स्थिती कायम होती. त्यामुळे वाहतूकदारांनी आणि प्रवाशांनी मुंब्रा बाह्यवळण टाळत शहरातून जाणे पसंत केले. पण मुंब्रा स्थानक परिसर अरुंद असल्याने आणि फेरीवाल्यांनी बस्तान बांधल्यामुळे येथेही अभूतपूर्व कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तासांहून अधिक काळ लागल्याचे समजते.
कळवा, मुंब्रा भागात झालेल्या कोंडीचा परिणाम शिळ रोडवरही दिसून आला. येथील रस्त्यांवर आधीच खड्डे पडल्यामुळे रोजच कोंडी होत आहे. या कोंडीत बुधवारी आणखी भर पडली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600