जिल्हा
कोंडी करणाऱ्या भिंती पाडल्या; घोडबंदरची 'वाट' मोकळी होणार
ठाणे: घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीस कारण ठरलेली वाघबीळ येथील वनविभागाची भिंत आणि कॉसमॉस ज्वेल्स येथील भिंत दूर करण्याची कार्यवाही सुरू झाल्याने येथील वाहतूक कोंडीचे दुष्टचक्र लवकरच संपण्याची शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असून या कामामुळे या भागात नागरिकांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये बऱ्याचदा खासगी वाहनांसह अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिकाही अडकतात. आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास अथवा रूग्णवाहिकेमध्ये अत्यवस्थ रूग्ण असल्यास वेळीच मदत न मिळाल्याने नाहक जीव जाण्याची भीती असते.
घोडबंदरहून इच्छितस्थळी जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने या मार्गावरील वाहतुककोंडीमुळे कमीत-कमी अंतरासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागत आहे. या अडचणींबाबत माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक आणि शिवसेना विभागप्रमुख रवि घरत यांच्याकडे नागरिकांनी चर्चा केली होती. वाघबीळ येथे वनविभागाच्या जागेवर असलेल्या भिंतीमुळे तसेच कॉसमॉस ज्वेल्स येथे असलेल्या भिंतीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने या भिंतीचा अडसर दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन महापालिकेच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर या भिंती पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार पाठपुरावा केला होता.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600