जिल्हा
विद्यापीठाने संस्थेला आकारलेला लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी
विद्यापीठाने संस्थेला आकारलेला लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी
फोटो: ठाणे वैभव
२७ विद्यार्थ्यांची आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव
ठाणे : मुंबई विद्यापीठाने कासारवडवली येथील एका शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून आकारलेला लाखो रुपयांचा दंड डिग्री कॉलेजने २७ विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या ८७व्या कार्यक्रमात कासारवडवली येथील एका शिक्षण संस्थेच्या डिग्री कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांची व्यथा मांडली. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाकडे उशिरा प्रवेश अर्ज दिल्याचा ठपका ठेवून विद्यापीठाने महाविद्यालयास दंड आकारला आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार २१ ते ४० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयास दहा लाख रुपये दंड अधिक प्रती विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात यावी. तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून २५ टक्के इतकी कपात करून चौकशी समिती गठित करावी. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात यावा. याबाबतचे पत्र विद्यापीठाने संबंधित शिक्षण संस्थेस पाठवले आहे. मात्र संस्थेने हा लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी श्री.केळकर यांना साकडे घातले आहे.
याबाबत श्री.केळकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विद्यापीठाच्या उप कुलगुरूंना पुढील आठवड्यात भेटून या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. काही संस्था मिशन म्हणून तर काही कमिशनसाठी काम करत आहेत. विविध शैक्षणिक संस्था पालकांना भूलथापा देऊन मुलांना प्रवेश देतात, मात्र वर्ष अखेरीस विद्यार्थ्यांवर विविध त्रुटींमुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची तसेच आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ येते. त्यामुळे पालकांनी सावध रहाण्याचे आवाहन श्री.केळकर यांनी केले. संस्थांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश द्यावेत. मात्र काही संस्था विद्यापीठाकडून सवलत मिळेल या आशेने विद्यार्थ्यांना मुदतीनंतरही प्रवेश देतात. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो, असेही श्री.केळकर म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विविध कामांसाठी खाजगी नेमणुका करण्यात आल्या होत्या. यात काही वाहनचालकांच्याही नेमणुका झाल्या. मात्र अद्याप यातील सात वाहनचालकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नसून ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे खेटे घालत आहेत. या चालकांनी श्री.केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन दिलासा देण्याची विनंती केली. यावेळी श्री.केळकर यांनी तत्काळ संबंधितांना फोन करून ही बाब निदर्शनास आणून दिली. या वाहनचालकांना तीन चार दिवसांत त्यांचा थकीत मोबदला मिळणार असल्याचे ते म्हणाले.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात शासकीय जमिनीवरील झालेले अतिक्रमण तोडल्यानंतर पुन्हा त्या जागी बांधकामे झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. महसूल विभागातील अधिकारी या बांधकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही बांधकामे होत असल्याचे श्री.केळकर म्हणाले. याबाबत संबंधितांशी बोलून तातडीने बांधकामे निष्कासित करण्यास सांगितल्याचे श्री.केळकर म्हणाले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600