जिल्हा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली कडोंमपाला कारणे दाखवा नोटीस
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली कडोंमपाला कारणे दाखवा नोटीस
फोटो: ठाणे वैभव
नाल्यातील सांडपाणी थेट उल्हास नदीत
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती औद्योगिक सांडपाणी विना प्रक्रिया उल्हास नदीत सोडले जात असल्याने उल्हास नदीचे पात्र प्रदूषित होत आहे. त्याचबरोबर उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. ही जलपर्णी काढण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू आहे. दरम्यान उल्हास नदीपात्रात दोन नाल्यांमधून पाणी सोडले जात असल्याने नदीपात्र दूषित होत आहे. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
इतर नगरपालिकांकडून नदीपात्रात सोडले जाणारे घातक सांडपाण्याचे स्त्रोत शोधण्याबाबतची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू असून यानंतर उल्हास नदी स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदी पात्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील घातक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याने नदी पात्र प्रदूषित होत आहे. प्रदूषणाचा धोका वाढत असल्याने तसेच नदी पात्राला जलपर्णीचा विळखा घट्ट होत असल्याने याविरोधात मी कल्याणकर संस्थेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नदीपात्र स्वच्छतेसाठी थेट १० दिवस नदीपात्रात आंदोलन छेडत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला होता. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरु केले असून मागील काही दिवसात नदी पत्रातील जलपर्णी काही प्रमाणात काढण्यात यश आले आहे.
दरम्यान कल्याण- डोंबिवली महापालिकेसह इतर नगरपालिकांकडून नदीपात्रात सोडले जाणारे घातक सांडपाण्याचे स्त्रोत शोधण्याबाबतची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू आहे. तद्नंतर उल्हास नदी स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता जयवंत हजारे यांनी सांगितले. तर नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत महापालिकांकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत किंवा जाणार आहेत. याबाबतची माहिती त्यांच्याकडून घेऊन या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान जलपर्णी काढण्याचे काम मागील सात दिवसांपासून सुरू असून नदीपात्रातील जलपर्णी पूर्णपणे काढली जाईल तसेच घरगुती सांडपाणी नदीपात्रात सोडल्याबाबत महापालिकेला कारणे दाखवा नोटीस दिल्याचेही हजारे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600