महाराष्ट्र
महेश गायकवाडवर शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती मात्र गंभीर
पालकमंत्र्यांनी घेतली भेट
ठाणे : जखमी महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी दुपारी त्यांची भेट घेतली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. दरम्यान, याप्रकरणात पोलीस प्रशासन त्यांचे योग्य ते काम करतील, असे देसाई यांनी सांगितले.
शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथील पोलिस ठाण्यात गोळीबार झाला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा ठाण्यातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान रविवारी दुपारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली.यावेळी देसाई यांनी महेश गायकवाड यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. त्यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की डॉक्टरांचे प्रयत्न सुरु आहेत. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केवळ महेश गायकवाड यांना पाहिले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला सांगितले की गायकवाड यांना योग्य ते उपचार दिले जात आहेत. डॉक्टर सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600