जिल्हा
अंबरनाथ नगरपरिषदेत येणार महिला राज
* आरक्षण सोडत जाहीर
* ५९ पैकी ३० जागा राखीव
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ५९ सदस्यांपैकी ३० जागा या महिलांसाठी राखीव रहाणार असल्याने आगामी नगरपरिषदेत महिला राज येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज ८ ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेमध्ये आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील २९ प्रभागांमधील प्रभागनिहाय आरक्षण सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून पारदर्शक पध्दतीने जाहीर करण्यात आली.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २९ प्रभाग असून ५९ सदस्य संख्या असणार आहे. त्यातील २८ प्रभाग हे द्विसदस्यीय तर प्रभाग चार हा एक प्रभाग त्रिसदस्यीय असणार आहे. ५९ सदस्यांपैकी ३० जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण देखील महिलांसाठी राखीव झाले असल्याने अनेक नवे चेहरे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणार आहेत. त्यामुळे अंबरनाथ नगरपरिषदेवर महिलांचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रमात शहरातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक नगरसेवक, तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग निहाय आरक्षण
* अनुसूचित जाती: आठ जागा. त्यातील चार जागा महिलांसाठी राखीव
* अनुसूचित जमाती: दोन जागा. एक जागा महिलांसाठी राखीव
* नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग: १६ जागा. आठ जागा महिलांसाठी राखीव
* सर्वसाधारण प्रवर्ग: ३३ जागा. १७ जागा महिलांसाठी राखीव
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600