देश-विदेश
ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांसाठी भरीव तरतूद करा
खासदार नरेश म्हस्के यांची मागणी
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण स्थळांचा विकासकामांच्या यादीत समावेश करून भरीव तरतुद करावी, अशी सूचना आज खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत एका महत्वपूर्ण बैठकीत केली.
नगरविकास आणि गृह विभागाची बैठक आज संसद भवन, नवी दिल्ली येथे चेअरमन मगुंटा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या कमिटीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के बैठकीस उपस्थित होते. देशभरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि केलेल्या कामांचे मूल्यांकन या संदर्भात पर्यटन, सांस्कृतिक, नगरविकास आणि गृहनिर्माण एनबीएससी आणि एनयुपीसीओ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बैठकीत सादरीकरण केले. खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत राष्ट्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासंदर्भात तसेच पर्यटन वाढीबाबत मुद्दे मांडून चर्चा केली.
महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे अशी आहेत की ज्यांचा समावेश अद्याप विकासकामांमध्ये केला गेलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड, जन्मस्थान शिवनेरी किल्ला, पंढरपूर, कोल्हापूर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा विकासकामांमध्ये समावेश पुढील काळात करावा व त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली.
प्रसाद योजनेअंतर्गत ज्या स्थानांचा विकास होत आहे त्याच्या पुढे परिचलनाच्या दृष्टीनेही विचार करणे गरजेचे आहे. इको फ्रेन्डली व्यवस्थापन तसेच वेस्ट मॅनेजमेंट या दृष्टीनेही विचार करणे गरजेचे आहे. या योजनांमध्ये स्थानिक भूमीपुत्र तसेच नागरिकांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यांना रोजगार कसा मिळेल याचाही विचार या विकासाकामांमध्ये करणे गरजेचे आहे. धार्मिक पर्यटन ठिकाणांच्या येथे पर्यावरण अटी शिथिल करुन पर्यटन धोरण सोपे बनविणे गरजेचे आहे, अशीही सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
या विभागासंदर्भात अनेक मुद्दे खासदार नरेश म्हस्के यांनी लेखी तसेच तोंडी स्वरूपात मांडले. संबंधित विभागाचे सचिव तसेच प्रमुख अधिकारी, अध्यक्ष यांनी या धोरणांत लवकरच बदल करून विकासाच्या दृष्टीने पावले टाकण्याचा शब्द खासदार नरेश म्हस्के यांना दिला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600