जिल्हा
राजस्थानमधून १०० कोटीचे एमडी ड्रग्ज आणि रसायने जप्त
राजस्थानमधून १०० कोटीचे एमडी ड्रग्ज आणि रसायने जप्त
फोटो: ठाणे वैभव
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांकडून कारखाना उद्ध्वस्त
भाईंदर: मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या युनिट १ आणि युनिट २ च्या संयुक्त कारवाईत राजस्थान राज्यातील झुनझुन येथील एमडी ड्रग्ज बनविणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश करुन सुमारे १०० कोटींचे ड्रग्जसह दाऊद इब्राहिमचा सहकारी आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात मोहम्मद परवानीसह ११ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले.
या प्रकरणी काशीगाव पोलिस ठाण्यात ४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी गस्त घालत असताना संशयावरुन सहा इसमांची झडती घेतली असता त्यांचे कब्जात एक कोटी ३२ हजार रुपये किमतीचा ५०१.६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स, एक लाख ८६ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल आणि चार लाख १० हजार रुपये किमतीच्या चार मोटार सायकल मिळुन आल्या. याबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयाचा तपास करीत असताना पुढील तपासादरम्यान फरार आरोपीचा शोध घेताना प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. राजस्थान येथे केलेल्या तपासामध्ये १४ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस पथकास झुनझुनु, राजस्थान येथे आरोपी अनिल विजयपाल सिहाग व एमडी ड्रग्स बनविण्याचा कारखाना आढळून आला. या कारखान्यात सुमारे १० किलो एमडी ड्रग्स, एमडीची प्री-कर्सर रसायने तसेच एमडी ड्रग्स बनविण्याची आवश्यक ती साधनसामुग्री (फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, बजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ) असा एकूण १०० कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600