जिल्हा
नवी मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचा शाळांना खणखणीत इशारा
नवी मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचा शाळांना खणखणीत इशारा
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांनी त्रिभाषा सूत्र राबवायचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या या धोरणाला राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रातील शाळा पहिलीपासून हिंदी कशा शिकवतात हे आम्ही बघतो असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. तसेच सर्व शाळांनी या शासन निर्णयाला विरोध करावा असेही म्हटले आहे. त्यासाठी ठाकरे यांचे पत्र महाराष्ट्रातील सर्व शाळांना देण्यात येणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मनसे प्रवक्ते, मनसे विद्यार्थी सेना सरचिटणीस व मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आज वाशीमधील शाळांना राज ठाकरे यांचे पत्र देण्यात आले.
वाशीमधील फादर एग्नल, सेंट मेरी, सेक्रेड हार्ट, सेंट लौरेन्स या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून पत्र देण्यात आले. तसेच त्यांना विनंती करण्यात आली की त्यांनी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून शिकवू नये. तसेच राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला विरोध करावा. यावेळी अचानकपणे असे हिंदी आम्हाला पहिलीपासून शिकवता येणार नसल्याचे काही शाळेतील मुख्याध्यापकांनी मनसे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच पहिलीला तीन भाषा शिकवल्याने विद्यार्थ्यांवर ताण पडेल असेही मान्य केले. त्यामुळे राज्य सरकारने शाळा व्यवस्थापन, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण तज्ञ् अशा कोणाकडूनही अभिप्राय न घेता हिंदी भाषा लादण्याचे धोरण का अवलंबले असा प्रश्न उपस्थित होतो.
लवकरच मनसे सर्व शाळांना राज ठाकरे यांचे पत्र देईल असे गजानन काळे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600